लोकसभा सार्वत्रिक निवडणूक; बीएलओमार्फत घरोघरी मतदार चिट्टीचे वाटप करा-जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचे निर्देश

 


   अमरावती, amaravatinews : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने मतदारांना मतदान केंद्र, नाव, यादी क्रमांक आदी बाबीची माहिती व्हावी, यासाठी इन्फॉर्मेशन स्लीपचे वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक मतदारांना बिएलओमार्फत घरोघरी जाऊन इन्फॉर्मेशन स्लीप वाटप करावे. मतदारांना स्लीपचे वाटप होत आहे याची खातरजमा करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी संबंधिताना दिले. 


      अमरावती विधानसभा मतदार संघातील रहाटगाव मतदान केंद्राला जिल्हाधिकारी कटियार यांनी सोमवारी भेट दिली. यावेळी प्रातनिधीक स्वरुपात मतदारांना मतदार चिट्टीचे वाटप करण्यात आले. सहाय्यक निवडणूक अधिकारी अनिल भटकर, मनपा उपायुक्त शामसुंदर देव, अमरावतीचे तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.


         अमरावती लोकसभा मतदारसंघ अंतर्गत अमरावती विधानसभा मतदारसंघात 'व्होटर इन्फॉरमेशन स्लीप' अर्थात मतदार चिट्टीचे वाटप करण्यात येत आहे. या स्लीपमध्ये मतदाराचे पूर्ण नाव, यादी भाग क्रमांक, यादीतील मतदाराचा अनुक्रमांक, मतदान केंद्राचे नाव, आयोगाचा टोल फ्री नंबर, मतदानाची तारीख, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे नाव त्यांचे संपर्क क्रमांक इत्यादी माहिती नोंदविलेली आहे. या स्लीपचा मतदारांना निश्चितच फायदा होणार आहे. या स्लीपच्या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्र रांग तसेच ज्येष्ठ, दिव्यांग, अंध, अशक्त मतदारांना प्राधान्य दिले जाईल याची सुद्धा नोंद आहे. सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन या स्लिपचे शंभर टक्के वाटप करणार आहेत. या सुविधेचा सर्व मतदारांनी लाभ घेऊन मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे जिल्हाधिकारी कटियार यांनी केले. 


Post a Comment

Previous Post Next Post