उदगीर : ग्राहकांनी कायद्यांचा आधारे न्याय मिळवणे, हा जसा त्यांचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे कोणताही व्यवहार करतांना तो अत्यंत सतर्कतेने आणि सावधपणे करणेही तेवढेच महत्त्वाचे असते. असे प्रतिपादन तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले.
१५ मार्च जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने उदगीर तहसील कार्यालयाच्या वतीने तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष पदावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, अशासकीय सदस्य व्ही.एस.कुलकर्णी, ग्राहक हित संस्थेचे मराठवाड्याचे अध्यक्ष अनंत पारसेवार, जिल्हाध्यक्ष युवराज धोतरे, प्रांत ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्षा सौ. संगीता नेत्रगावे-पाटील, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे उदगीर तालुकाध्यक्ष प्राचार्य व्ही.एस.कणसे, तालुकाध्यक्ष कुंदन मॅडम, रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष रणजीत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर म्हणाले की, ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी तथा ग्राहक कायद्याचे जनक यांच्या प्रेरणेने स्थापित ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्रातील कोणाकोपऱ्यासह, जिल्हा, तालुका, शहर, गाव, वाडी, तांडा वस्तीमध्ये पायाला भिंगरी बांधून ग्राहक पंचायतीची जनजागृती, जाणीव जागृती, ग्राहक चळवळ कायद्याची माहिती दिली जाते. तसेच त्यासाठी ग्राहकांनी पुढील गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. दिखाव्याला भुलून कोणतीही वस्तू खरेदी करू नका. वस्तुविषयी पूर्ण माहिती घेऊन ती योग्य असल्याची निश्चिती झाल्यावरच ती खरेदी करा.वस्तूच्या वेष्टनावरील छापील मूल्य पाहून निश्चिती करा. त्याहून (एम्.आर्.पी.) अधिक रक्कम देऊ नका.वस्तूची कमाल वापर मर्यादा (एक्सपायरी डेट) तपासून मगच खरेदी करा.वस्तू खरेदी केल्यानंतर त्याचे देयक (बिल) मागून घ्या.आपण केलेला व्यवहार किंवा खरेदी यांच्या संबंधी सर्व कागदपत्रे जपून ठेवा. तक्रार करतांना यांची आवश्यकता असेल.आपण जेथून वस्तू खरेदी केल्या, त्या व्यावसायिक/आस्थापन यांचे नाव, पत्ता इत्यादी माहिती घेऊन ठेवण्याचा प्रयत्न करा.ऑनलाईन खरेदी केल्यावर दिलेल्या देयकाची ‘ई-रिसीट’ जपून ठेवा.वरील गोष्टींची काळजी घेऊन व्यवहार केल्यास ग्राहक त्याच्या अधिकारांचा वापर सक्षमपणे करत असल्याचे निश्चित होईल आणि ग्राहकालाही खरेदीचे योग्य समाधान मिळू शकेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नायब तहसीलदार संतोष गुट्टे यांनी केले. तर आभार प्रदर्शन पुरवठ्याचे नायब तहसीलदार राजेश बेंबळगे, पुरवठा सहाय्यक विद्या पवार यांनी मानले.