किनवट : सारखणी मांडवी रोडवर दहेली गावानजीक तीन वाजता च्या दरम्यान एका वळणावर बुलेट गाडीवर जाणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांचा भीषण अपघात झाला असून दोघे ठार तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की बारावीची परीक्षा देऊन अंजनखेड, माहूर वरून दहेली आपल्या गावा कडे जात असताना दहेली गावानजीकच्या वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार, गणेश तोटावार या विद्यार्थ्यांचा अपघात झाला. बाभळीच्या झाडावर बुलेट गाडी धडकल्याने तिघेही गंभीर जखमी झाले. वेळीच दहेली गावचे सरपंच राकेश तोटावर यांनी वाहन करून प्राथमिक इलाज करण्यासाठी दहेली तांडा येथे या तिघांनाही दाखल केले. तेथून प्राथमिक इलाज करून ॲम्बुलन्सने यवतमाळ येथे हलवण्यात आले. यवतमाळ येथील क्रिटीकेअरच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रतिक लेंडे, कृष्णा बोंतावार यांना मृत घोषित केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु घरच्या लोकांनी अद्याप पर्यंत याला दुजोरा दिलेला नाही. गणेश तोटावर या विद्यार्थ्याच्या पायाला जबर मार लागल्याची माहिती समोर येत आहे. अगदी गावाजवळ येऊन हा भीषण अपघात झाल्याने दहेली गावावर शोककळा पसरली आहे.
दहेली गावानजीकच्या वळणावर आजपर्यंत अनेक अपघात झाले असून या रस्त्यावर अपघात प्रवण स्थळ असे दर्शवणारा एकही फलक नसून या वळणावर दोनही दिशेने गतिरोधक टाकण्याची मांगणी दहेली येथील सरपंच राकेश तोटावर यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देईल का असा प्रश्न याप्रसंगी उपस्थित होत आहे.