अकोला : सहकार महर्षी भास्करराव शिंगणे कला महाविद्यालय खामगावचे वतीने यावर्षीपासून सुरू झालेला " श्रीमती शालिनीताई देशमुख स्मृती ' वैखरी ' राज्य साहित्य पुरस्कार 2023 " आपल्या अकोला नगरीतील सुपरिचित जेष्ठ कथालेखक कवीवर्य सुरेश पाचकवडे यांच्या " देहाक्षरं " या कथासंग्रहाला प्राप्त झाला. नुकताच खामगाव येथे या पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला . दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ , मराठी भाषा गौरवदिनी खामगाव येथे संपन्न झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हा पुरस्कार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कविवर्य मा. डॉ. इंद्रजीत भालेराव यांचे शुभहस्ते बारोमासकार सुप्रसिद्ध साहित्यिक मा. प्रा. डॉ. सदानंद देशमुख मुख्य संयोजक डॉ. विशाल इंगोले , प्राचार्य संजय पाटील प्रा. सद्गुण देशमुख आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सुरेश पाचकवडे यांना हा रोख रक्कम अकरा हजार रुपये स्मृतीचिन्ह , शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले .
सुरेश पाचकवडे यांच्या कथा कवितांची एकूण सहा पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या गोंदणवेणा या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पु.बा.भावे वाड्मय पुरस्कारही प्राप्त झालेला आहे . तसेच त्यांच्या इतरही साहित्यकृतीला अनेक साहित्य पुरस्कार प्राप्त झाले असून आतापर्यंत त्यांनी चार राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे संमेलन अध्यक्षपद भूषविलेले असून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये दोन वेळा निमंत्रित कवी म्हणून काव्य सादरीकरण केलेले आहे . ते विदर्भ साहित्य संघ अकोला शाखेचे उपाध्यक्ष आहेत .
कर्मयोगी संत गाडगेबाबा विद्यापीठ , अमरावती मध्ये बीकॉम द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात त्यांची कविताही समाविष्ट आहे . त्यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबद्दल साहित्य विश्वामध्ये त्यांचे अभिनंदन होत आहे.