माथाडी व सुरक्षा रक्षक कायदा सुधारणा विधेयकावर पुनर्विचार करण्यासाठी विशेष समिती गठीत



 मुंबई दि. २९ :- गेल्या तीन दिवसापासून मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या माथाडी कायदा बचाव कृती समितीचे आमरण व साखळी उपोषण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आज चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आले.



सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी माथाडी कायदा बचाव कृती समितीच्या शिष्टमंडळाची अधिवेशन चालू असतानाही मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा घडवून आणली. या शिष्टमंडळात विविध माथाडी कामगार संघटनेचे नेते उपस्थित होते या चर्चेतून माथाडी कामगार सुधारणा विधेयकांवर पुनर्विचार करण्यासाठी एक सर्वसाधारण समिती व ११ सदस्यांची कृती समिती गठित करण्यात आली. यामध्ये शासनाच्या कामगार, नगर विकास, पणन, गृह खात्याचे सचिव विविध माथाडी कामगार नेत्यांचा समावेश असून या समितीने तीन महिन्यांच्या आत माथाडी कायदा सुधारणा विधेयकावर चर्चा चौकशी करून तीन महिन्यांच्या कालावधीत शासनाला प्रस्ताव सादर करावा. तोपर्यंत माथाडी कायदा सुधारणा विधेयकातील सुधारणा प्रलंबित ठेवण्यात येतील असाही निर्णय घेण्यात आला व त्या निर्णयाचे लेखी पत्र मंत्री महोदय दादा भुसे यांनी आझाद मैदानातील माथाडी कामगारांच्या उपोषणा स्थळी ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांच्या हाती सुपुर्द केले व दादा भुसे यांच्या हस्ते बाबा आढाव यांना ज्युस पाजून उपोषण थांबविले. कामगार नेते माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी वेगाने हालचाल करून शासन आणि माथाडी कायदा बचाव कृती समितीमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी अथक मेहनत घेतली, तर आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी कायद्यातील सुधारणा विधेयकावर विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. 

     माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशा झालेली चचा व निर्णयाची माहिती आंदोलनकांना दिली. उपोषणाच्या शेवटी बोलताना बाबा आढाव म्हणाले की, या तीन महिन्यांच्या अवधीत माथाडी मंडळांचा घसरलेला कारभार सुधारला पाहिजे, माथाडीच्या कार्यक्षेत्रात गुंडगिरी करणाऱ्या खंडणीखोरांचा बंदोबस्त झाला पाहिजे, आमच्यातले जर कोणी गुंडगिरी करत असतील तर आम्ही त्यांचा बंदोबस्त करू. स्वच्छ कारभाराने लोकांना न्याय दिसला पाहिजे असे ते म्हणाले व नरेंद्र पाटील आणि माथाडी नेते व कामगार यांनी गेले चार दिवसापासून उपोषणाला पोलीस यंत्रणा, मिडीया, वृत्त प्रतिनिधी, माथाडी कामगार यांनी दिलेला प्रतिसाद आणि उपोषण स्थळी पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सर्व नेत्यांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post