स्वर्गीय श्रीधररावजी देशमुख उपाख्य मालक जयंती उत्सव
निंबा: स्वर्गीय श्रीधररावजी देशमुख उपाख्य मालक यांच्या १०१ व्या जयंती निमित्त निंबा व परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. सदर उपक्रम हा स्वर्गीय श्रीधररावजी देशमुख उपाख्य मालक प्रतिष्ठान, निंबा व जिल्हा रुग्णालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जात आहे. या शिबिरात जिल्हा रुग्णालय, अकोला येथील तज्ञ वैद्यकीय पथक आपली तपासणी सेवा देणार आहे.
शिबिर हे शुक्रवार, २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.०० वाजेपर्यंत, श्री मारुती संस्थान, निंबा ता. बाळापूर जि. अकोला येथे संपन्न होणार असून शिबिराचे उद्घाटन हे जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला डॉ. सौ. तरंगतुषार वारे तसेच प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच, खुर्सापार, काटोल, नागपूरचे प्रा. सुधीर अण्णाजी गोतमारे, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, शेगाव चे संचालक मंडळ सदस्य श्री. राजेंद्र विश्वनाथ शेगोकार, विश्व मांगल्य सभेच्या विदर्भ प्रांत यात्रा संयोजिका सौ. अपर्णाताई शिरीष धोत्रे यांचा समावेश आहे.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरासाठी नोंदणी मोफत ठेवण्यात आली असून फक्त नोंदणीकृत रुग्णांनाच या शिबिराचा लाभ घेता येईल. शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या मोतीबिंदूच्या रुग्णांवर ही शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय, अकोला येथे होईल, त्यासाठी रुग्णांनी तपासणीनंतर दिलेल्या तारखेला हजर राहणे आवश्यक असेल. शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालय, अकोला यांच्या वाहनाद्वारे मोफत प्रवासाची व्यवस्था केलेली असून, गरजू रुग्णांना औषधी सुद्धा मोफत देण्यात येईल असे आयोजकांनी कळविले आहे. तरी निंबा व परिसरातील गरजू नागरिकांनी या सेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन स्वर्गीय श्रीधररावजी देशमुख उपाख्य मालक प्रतिष्ठान, निंबा चे सचिव प्रा. डॉ. मंदार कृष्णराव देशमुख यांनी केले आहे.