हजारों भीम सैनिकांच्या संख्येने गजबजला छत्रपती शिवाजी महाराज चौक
धामणगाव रेल्वे - सुरज वानखडे
२१ जानेवारी रोजी बाबासाहेबांचे कार्य त्यांचा संघर्ष लोकापर्यत पोहचविण्याचे काम आपणाकडून झाले पाहिजे या उद्देश्याने भीमरत्न युवा प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभेच्या च्या वतीने धामणगावात प्रथमच "परिवर्तन पहाट" या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला पुज्ज भदन्त सारीपुत्त ( अकोला ), जगदीश गवई राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जम्मू काश्मीर, भीमराव कांबळे राष्ट्रीय सचिव भारतीय बौद्ध महासभा तेलंगणा, राहुल गायकवाड तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा धामणगाव रेल्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वप्रथम प्रमुख उपस्थितांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात पहाटे ६ वाजता समता सैनिक दलाचे प्रमुख सचिन मून यांच्या वतीने मानवंदना देऊन करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रमुख आकर्षणासाठी आमंत्रित व्याख्याते व विद्रोही कवी गोविंद पोलाड, गायक अजय डेहाळे, संविधान मनोहरे, मनस्वी खडसे, अँकर प्रणोती मडावी, रिलस्टार खतरनाक सुमित, प्रतीक सोनटक्के, भाविक वागळे, साक्षी चिंचखेड, बा भीमा ढोल ताशा पथक, रॅप टोली, ए. के डान्स ग्रुप, आर. एस प्रो साउंड, बीट रॅपर यांनी आपली कला सादर केली. त्यामध्ये बाबासाहेबांच्या विचाराची आजच्या काळात किती गरज आहे हे गायनातून, रॅप मधून भाषणांमधून उपस्थितांपर्यंत पोहचविले तर उपस्थित भीमानुयायांनीसुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद देत नाचत गाजत कार्यक्रमाचा आनंद लुटला..
सदरच्या कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फुर्द प्रतिसाद दिला असून धामणगाव शहरासह आजूबाजूच्या गावामधून हजारोच्या संख्येने महिला, पुरुष पहाटे ६ वाजतापासून कार्यक्रमाला उपस्थित असून जवळपास अडीच हजार लोकसंख्येने छत्रपती शिवाजी चौक गजबजला होता.
संविधान मनोहरे, अजय देहाडे, बिट रॅपर यांच्या गायनाने थिरकले भीम अनुयायी
कार्यक्रमाच्या आकर्षणासाठी प्रसिद्ध व्यक्ते, गायक, रिल्स स्टार, ढोल पथक, याना बोलविण्यात आले होते, त्यात प्रत्येकानेच आपली कला सादर केली परंतु संविधान मनोहरे, अजय देहाडे व बिट रॅपर यांच्या गायनाने संपूर्ण कार्यक्रमात रंगत आणत उपस्थित उपासक उपासकांनी सुद्धा त्यांच्या गायनावर नाचण्याचा आनंद घेतला असून हजारोच्या संख्येने उपस्थित नागरिक भीमगीतांवर थिरकत होते. धामणगावात परिवर्तन पहाट चा पहिलाच कार्यक्रम असताना अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यासाठी उपस्थितांनी आयोजकांचे आभार मानले.
यावेळी भीमरत्न युवा प्रतिष्ठान व भारतीय बौद्ध महासभेच्या च्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणोती मडावी हिने केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भीम रत्न युवा प्रतिष्ठान, भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सैनिक दलाच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली...