जायकवाडी पक्षी अभयारण्यात AWC पक्षी जनगणना

 



फ्लेमिंगो (रोहित) पक्षाने फिरवली जायकवाडीकडे पाठ


अहमदनगर | आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायकवाडी (नाथसागर) जलाशय हे पक्षी अभयारण्य असण्याने या ठिकाणी विविध क्षेत्रातून येणाऱ्या हजारो प्रजातींच्या पक्षांमुळे पर्यटकांचे केंद्रबिंदू मानले जाते.ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये युरोपमध्ये कडाक्याची थंडी जाणवते. हिमवृष्टी आणि थंडीमुळे सायबेरिया, मध्य आशिया, रशिया आणि लडाखमध्ये पक्षी त्यांचे इच्छित अन्न गमावतात. अन्नाच्या शोधात परदेशी पाहुणे पक्षी सुमारे पाच हजार किलोमीटरचा हवाई प्रवास करून नाथसागरच्या विशाल जलसाठ्यात पोहोचून आपला तळ ठोकतात. नाथसागर जलाशयाचा आकार बशीसारखा आहे, ज्यामुळे पक्ष्यांना अन्न शोधणे सोपे होते.एकवीस विविध पाणथळ ठिकाणी तीनशे चाळीस हेक्टर क्षेत्रावर वसलेल्या जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पक्षांची गनना वन विभागाच्या वतीने करण्यात आली.यामधे जायकवाडी पक्षी अभयारण्यातील सोनेवाडीत पक्षी गणनेत ३१२ पक्षांची नोंद झाली असल्याची माहिती वनपाल रुपाली सोळसे आणि पक्षीमित्र प्रा.संतोष गव्हाणे यांनी दिली.

जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पक्षी गणनेची सुरुवात दिनांक २१ जानेवारी रोजी झाली.यात सोनेवाडी या भागात वनपाल रुपाली सोळसे यांच्या नेतृत्वात आणि प्रा.संतोष गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात प्रा.संतोष तांबे, श्रद्धा गव्हाणे, महेंद्र नरके, कुलदीप गव्हाणे, श्रेयस गव्हाणे, बाळु सातपुते आदीं पक्षीप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला होता. या पक्षी गणनेत विविध पक्षांच्या तीनशे हून अधिक पक्षांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.


यात सापडलेले आणि नोंदवलेले पक्षी खालील प्रमाणे


पान कावळे १९९, जांभळी पाणकोंबडी ३०, हळदी कुंकू २०, लहान बगळा ३, व्हाईट नेक आयबिज १, ग्लॉसी आयबिज २, वारकरी १२, नदी सुरय ६, चक्रवाक ४, काळया पंखाची टिटवी ४, चमच्या ३, राखाडी बगळा ११, डार्टर १, डोमेसियल क्रेन १, पांढरा छातीचा खंड्या २, रेड पोचार्ड १, गर्गिणी ६ अशी नोंद आढळली.




फ्लेमिंगो पक्षाने फिरवली जायकवाडी कडे पाठ


हा पाणथळ जागी थव्याने राहणारा, फिनिकोप्टेरस जातीतला पक्षी आहे. उंच मान व लांब पाय असलेल्या रोहिताची पिसे गुलाबी किंवा फिक्या गुलाबी रंगाची असतात.काही विशिष्ट प्रकारचे शेवाळे खाल्ल्यामुळे राहित पक्ष्याच्या पंखाखाली गुलाबी रंगाची छटा तयार होते. गुलाबी रंग हे या पक्ष्याचे वैशिष्ट्य आहे. रोहित पक्ष्याची चोच ही खास असते. चोचीच्या आकारामुळे या पक्ष्याला चिखलामधील खाणे शोधणे अतिशय सोपे जाते.तसेच याच चोचीने ते चिखलाचे घरटेदेखील बनवतात.दिसायला अतिशय आकर्षक असणाऱ्या या पक्ष्याचे चित्र टिपायला अनेक पर्यावरणप्रेमी ,पक्षीप्रेमी गर्दी करतात मात्र यावर्षी या पक्षांनी जायकवाडी जलाशयाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून येत आहे.


जलाशयावर होणाऱ्या तरंगता सौर ऊर्जा प्रकल्पामुळेही होणार पक्षांना त्रास


पक्षी अभयारण्य म्हणून घोषित असलेल्या या जलाशयावर केंद्र शासन व राज्य शासनाने तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प राबवल्यास मंजुरी दिली आहे. नोव्हेंबर महिन्यानंतर या जलाशयाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर कमतरता येऊ उन्हाळ्याच्या महिनाअखेरीस केवळ मृत साठा शिल्लक राहतो आणि या शिल्लक साठ्यावर अशा प्रकारचे प्रोजेक्ट उभारल्यास पक्षांना वास्तव करण्यासाठी धोका निर्माण होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून या जलाशयावर पक्षांची घट पाहायला मिळत आहे परंतु अशा जलाशयावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प पाहायला मिळाला तर काही दिवसातच पक्षी अभयारण्य म्हणून ओळखला जाणारा हा जलाशय केवळ नावालाच पक्षी अभयारण्य म्हणून राहील असाही धोका नाकारता येत नाही.


जायकवाडी जलाशयाच्या काठावर स्वच्छता ठेवणे महत्त्वाचे


जायकवाडी जलाशयावर येणारे सर्व पक्षी जायकवाडी जलाशयाच्या काठावर वावरत असतात. जायकवाडीच्या काठावर मासेमारी करणाऱ्यांनी स्वच्छता ठेवणे अतिशय महत्त्वाचे आहे.जायकवाडीच्या काठावरील जुने जाळे,कापड, थर्माकॉलचे तुकडे यामुळे पक्षांनाही त्रास होतो त्याचप्रमाणे जायकवाडी जलाशयातील क्षेत्रामधील झाडांची संख्या कमी झाली आहे तसेच गुलाबी थंडीचे प्रमाण उशिरा झाल्यामुळेही पक्षांनी जलाशयाकडे पाठ फिरवली आहे.


- पक्षीप्रेमी डॉ.किशोर पाठक

Post a Comment

Previous Post Next Post