संभाजीनगर--- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेच्या मराठवाडा विभागीय महिला संघटन तथा संपर्क प्रमुख संभाजीनगर येथील दै.मराठवाडा केसरी या प्रथितयश वृत्तपत्राच्या संपादिका, युवा महिला पत्रकार सौ.संगिता राजपूत यांना *आचार्य अत्रे पत्रकार भूषण* या राज्यस्तरीय पुरस्काराने आळंदी येथे सन्मानित करण्यात आले आहे. दैनिक झुंजार केसरी आणि इंद्रायणी सेवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नामवंतांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.त्या प्रसंगी पत्रकार क्षेत्रात संवेदनशील जाणिवांच्या प्रबोधन आणि जागृतीपर पत्रकारितेतील सकारात्मक वास्तव वाटचालीबध्दल त्यांना प्राप्त झालेला हा बहूमान आहे.
देवाच्या आळंदीत २२ जानेवारी रोजी आयोजक संस्थांच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक दिग्गज अतिथींच्या प्रमुख उपस्थितीत या दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.तिथे पत्रकारिता हा छंद आणि सामाजिक बांधिलकी म्हणून स्विकारणाऱ्या पत्रकार संगीता राजपूत यांनाही शाल,श्रीफळ आणि आकर्षक सन्मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
त्यांना प्राप्त सन्मान हा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचाही बहूमान असून त्याबद्दल या संघटनेचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व केन्द्रीय पदाधिकारी तथा महाराष्ट्र संघटन व संपर्क प्रमुख भगिरथजी बद्दर, व संघटनेच्या मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.