डोंबिवली (प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
११ ऑगस्ट १९०८ साली मुझफ्फरनगरात, स्वदेशाच्या मुक्तीसाठी कोवळ्या तारुण्यात , देशाच्या प्राणवेदीवर आत्मबलिदान करून अमर झालेल्या खुदीराम बोस यांच्या , अवघ्या अठरा वर्षांच्या जीवनाची ओजस्वी कहाणी नाट्यरूपात भारतीय जनतेसमोर सादर करणाऱ्या 'क्राउड नाट्यसंस्थे' ने प्रस्तुत केलेलं आणि स्वर्ण पटकथा निर्मित दीर्घांकिका म्हणजे स्वदेशाभिमानी काळजाला हात घालणारी अभिनयकृती होती. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट या संस्थेचा हा धाडसी आणि असाधारण उपक्रम याच क्लबच्या सदस्या सौ.धनश्री भोसले यांच्या सूचनेनुसार १७ डिसेंबरच्या रविवारी आपल्या शहरातील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात, नाट्यरसिकांनी उत्स्फूर्त जल्लोषात संपन्न झाला.
क्लबचे सचिव रो.मनोज ओक यांच्या नेटक्या आणि औचित्यपूर्ण प्रास्ताविकाने सुरू झालेल्या या समारंभाची सुरुवातच अप्रतिम अशा प्रकाशयोजनेतल्या, ब्रिटिशकालीन रेल्वेच्या बोगींच्या दृश्याने झाली. अल्पावधीतच लहान लहान प्रसंगांतून विसाव्या शतकाच्या सुरुवातीची उत्तर भारतातली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती प्रस्थापित करणारी एकेक भूमिका रंगमंचावर साकार होत गेली.
प्रभावी प्रकाशयोजना , सूचक नेपथ्य , निवडक ऐतिहासिक प्रसंगांची निवड आणि तितकीच समयोचित संवादफेक या गुणांचा सहजसुंदर मेळ साधत तरूण अभिनेते मंडळींनी प्रेक्षकांच्या मनाची चांगलीच पकड घेतली.
स्वातंत्र्यदेवतेच्या "वंदे मातरम्" उद्घोष आणि स्वतंत्र भारतमाते साठी जीव कुर्बान करण्याचा जोश या दीर्घांक नाटिकेतून सादर करण्यात सर्वच कलाकार कमालीचे यशस्वी झालेले जाणवत होते. खुदीराम, त्याचं पालन पोषण करणारी बहीण, त्याच्या मुस्लिम मित्र, क्रांतिकारी संघटनेचे त्याचे गुरू या सर्वांच्याच भूमिका, नेमक्या प्रसंगांद्वारे ठसठशीत आणि भक्कमपणे साकार झालेल्या दिसत होत्या.
क्रांती कारकांनी घडवलेले बॉम्बविस्फोट, धूर, ध्वनियोजना आणि पात्रांच्या अचूक हालचाली यांच्या संयोगामधून जी वातावरण निर्मिती झाली होती ती प्रेक्षकांना इतिहासकाळात नेत गुंगवून ठेवण्यास पुरेशी होती. आपला स्वतःचा स्वार्थ पाहण्यात मग्न असलेल्या आणि चंगळवादी जीवन शैलीत गुरफटलेल्या आजच्या तरूणाईसाठी हा नाट्यानुभव म्हणजे एक गुंगीतून खडबडून जाग आणणारा अनुभव होता. समाजात धर्माधर्मात तेढ पसरवत आपला स्वार्थ साधणाऱ्या राजकीय शक्ती केवळ मूठभर सत्तालोलूप कंटकांचे हित साधतात हा संदेशही या नाट्य कृतीतून दिला गेला. क्लबचे अध्यक्ष दीपक काळे, प्रकल्प प्रमुख रो.मंदार कुलकर्णी, सचिव मनोज ओक, माजी अध्यक्ष दीपाली पाठक, श्रीपाद कुलकर्णी, रो.धनश्री भोसले आदींचा या उपक्रमाच्या यशात महत्त्वाचा वाटा होता. या नाट्यकृतीच्या व्यवहारातून जी गंगाजळी उत्पन्न होणार आहे तिचा विनियोग पुण्यात स्थित असलेल्या, युद्धभूमीवर लढतांना जखमी होऊन पॅराप्लेजिक झालेल्या अशा भारतीय सैन्याच्या मदतीसाठी करण्यात येणार आहे ही या प्रकल्पाची मोठी उपलब्धी असणार आहे हे रो. मनोज ओक यांनी प्रेक्षकांना आवर्जून सांगितले. डग्लस किंगजफोर्ड या न्यायाधीश अखंड भारताला परतंत्राच्या जोखडाखालून मुक्त करू पाहणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यवीरांपैकी खुदीराम बोस हा सर्वात कमी वयाचा तरूण. मुझफ्फरनगर रेल्वेस्टेशन अटक झाल्यापासून ते बलिदानाच्या वेदीवर, कंठाभोवती गळफास पडेस्तोवर हसतमुखाने वावरलेल्या खुदीराम च्या मुखी अखेरची गर्जना निनादली ती ,
"वंदे मातरम् !!!" या महान अशा स्वातंत्र्यवीराची यशोगाथा , सव्वा तासाच्या , एका ' दीर्घांकिकेत ' सामावून प्रथम सादर करण्यात आली त्यावेळी नाट्यगृह देशप्रेमी रसिकांनी तुडूंब भरुन गेलेले.
अशा प्रकारची स्फूर्तीगाथा सर्व नागरिकांसाठी, विशेषतः शालेय विद्यार्थीमित्रांसाठी, एक संस्कारांचा भाग म्हणून अधिक महत्त्वाची आहे.