कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेकरिता आलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना येथील डॉ. नीरज कदम यांच्या रुग्णालयामध्ये घडली.
वर्धा/News: कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेकरिता आलेल्या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना येथील डॉ. नीरज कदम यांच्या रुग्णालयामध्ये घडली. या प्रकरणी महिलेच्या नातलगांनी पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीत पत्नीचा मृत्यू कशाने झाला हे कळले नसल्याचे दयाल यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
जयवंती दयाल जाधव (वय ३०) असे मृत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तर दयाल फत्तुसिंग जाधव (वय ४०) रा. दहेगाव तांडा असे मृत महिलेच्या पतीचे नाव आहे. दयाल जाधव यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार गुरुवारी (ता. २१) सकाळी १० वाजता जयवंती जाधव हिला आर्वी येथील कदम हॉस्पिटल येथे आणले. यावेळी डॉक्टरांना कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन करण्याची बाब सांगितली.
डॉक्टरांनी सांगितलेले आवश्यक कागदपत्र तयार करून जयवंतीला रुग्णालयात दाखल केले. डॉ. कदम यांनी जयवंती जाधव यांची तपासणी केली. यावेळी त्यांनी ऑपरेशन करण्याकरिता आवश्यक औषधी आणायला सांगितली. औषधी आणल्यावर जयवंतीला ऑपरेशन रूममध्ये सायंकाळी नेले.
यावेळी डॉ. नीरज कदम यांच्यासह एक नर्स उपस्थित होती. तसेच दयाल यांचा पुतण्या गोकूळ जाधव हा सुद्धा उपस्थित असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.रुग्णाला सलाईन देण्याकरिता जयवंतीला सुई टोचली त्याच वेळी जयवंती बेशुद्धावस्थेत असल्याने पुतण्याने डॉक्टरांना हाक दिली. डॉ. नीरज कदम यांनी तपासणी केली असता जयवंतीचा मृत्यू झाल्याचे दिसून आले.
जयवंतीचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण गुलदस्त्यात आहे. शिवाय झालेल्या घटनेची तक्रार डॉ. नीरज कदम यांनी तत्काळ पोलिसात केली आहे.
शवविच्छेदनानंतर कळणार कारण...
जयवंती दयाल जाधव हिचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अजून उघडकीस आलेलं नाही. तिच्या शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण कळणार आहे. त्यानंतरच या प्रकरणात पोलिस पुढील चौकशी करणार आहे. या प्रकरणात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे आर्वी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय पाटणकर करीत आहे.
पेशन्टला गुरुवारी (ता. ११) कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेकरिता दुपारी दाखल केले. शस्त्रक्रिया आज शुक्रवारी (ता. २२) ठेवण्यात आली होती. रुग्णाला ऑपरेशनच्या अगोदरच्या दिवशी तयारीकरिता आणि अॅन्टीबायोटिक इंजेक्शन देण्याकरिता टेबलवर घेतले. अॅन्टीबायोटिक इंजेक्शन दिल्यानंतर व सलाईन सुरू करताच अचानक रुग्ण शॉकमध्ये गेली. पेशंटला वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले. परंतु पेशंटचा रात्री मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण न समजल्याने रुग्णाच्या शवविच्छेदनाकरिता पोलिसांना कळविण्यात आले. रुग्णाचा बहुतेक हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला असावा. - डॉ. नीरज कदम, कदम नर्सिंग होम आर्वी