विदर्भ संपादक मिलिंद जामनिक
मूर्तिजापूर - सकल धनगर समाजाच्या वतीने दिनांक ११ डिसेंबर सोमवार रोजी नागपूरच्या यशवंत स्टेडियम पासून लाखोच्या संख्येने धनगर समाजाचा भव्य मोर्चा निघाला व विधान भवनाच्या दिशेने मोर्चा धडकला.
सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी एकाच व्यासपीठावर यावेळी आल्याने महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यावेळी मोर्चाला मार्गदर्शन करताना माजी आमदार हरीदास भदे यांनी सरकारला इशारा दिला येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अस्तित्वात नसलेल्या 'धनगड' चे 'धनगर' करून अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ क्रमांकावर असलेल्या धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा महाराष्ट्रातील धनगर समाज प्रस्थापितांना सत्ताधाऱ्यांना घरी बसविल्याशिवाय राहणार नाही असे लाखोच्या संख्येने जमलेल्या समाज बांधवांसमोर आवाहन केले. यावेळी सर्वच राजकीय पदाधिकारी उपस्थित होते.मा आमदार राम शिंदे,मा आमदार गोपीचंद पडळकर,मा आमदार दत्तामामा भरणे , काॅग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर , माजी खासदार विकास महात्मे,मा आमदार प्रकाश शेंडगे , आबासाहेब देशमुख, ऍड. पुरुषोत्तम डाखोरे, रमेश पाटील, गणेश पावडे यांचेही मार्गदर्शन झाले .'पिवळा झेंडा फडकला धनगर आता भडकला' अशा घोषणा देत समाजाच्या वतीने यशवंत स्टेडियम पासून काढण्यात आलेल्या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी होते 'मी धनगर लिहिलेली टोपी' हातात पिवळा झेंडा, आणि कपाळावर भंडारा लावलेले कार्यकर्ते आकर्षणाचे केंद्र ठरले, अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, धनगर मेंढपाळाच्या चराई क्षेत्र व इतर प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात. हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नावाखाली, संघटनेच्या बॅनरखाली किंवा कोणत्याही आमदार , खासदारांच्या नेतृत्वाखाली नव्हता तर सकल धनगर समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य नागपूर अमरावती विभागातील सकल धनगर समाज बांधवांनी आयोजित केलेला होता व राज्याच्या कानाकोपऱ्यातून धनगर समाज बांधव मोर्चाला एकवटले होते व मोर्चा यशस्वी झाल्याचे संयोजक प्रा. एल डी सरोदे यांनी कळविले आहे.