जिल्हा परीषद पशुसंवर्धन विभागाचा अजब कारभार
श्रीकांत राऊत यवतमाळ
महागांव : सहा महिन्यांपासून मानधनाशिवाय काम करून घेतल्यानंतर आता सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले. हा प्रकार अन्यायकारक असल्याने कंत्राटी बेमुदत पशुधन पर्यवेक्षकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
जिल्हा परिषदेअंतर्गत पशुधन पर्यवेक्षक कार्यरत आहे. जनावरांवर आलेल्या लम्पी महामारीच्या काळातही त्यांनी सेवा बजावली. परंतु त्यांना मानधनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्यात आला. परंतु याची दखल घेण्यात आलेली नाही. आता तर त्यांना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले आहे. कामावरून कमी केल्याने भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच आर्थिक अडचणीतून मार्ग काढताना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. आतातर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. हा प्रश्न कंत्राटी पशुधन पर्यवेक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनातून मांडला आहे. यावर तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती उमरखेड, पुसद व महागांव कंत्राटी पशुधन पर्यवेक्षकांनी केली आहे.