माझे आयुष्य हे तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे. या विषयावर प्रबोधनात्मक कार्यशाळा संपन्न.






छत्रपती संभाजी नगर : समाज जीवनात कार्यरत फुले शाहू आंबेडकराईट विचारधारेच्या हितचिंतकांना, जनतेला जागृत करण्यासाठी 28 आक्टोबर 1954 ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई येथील पुरंदरे स्टेडियम येथे असे म्हटले होते की, "माझे आयुष्य हे तीन गुरू आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे." या विधानाची प्रासंगिकता लक्षात घेऊन विधानाच्या 70 व्या वर्धापनदिनानिमित्त या ज्वलंत विषयावर बामसेफ अंतर्गत फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलच्या वतीने जनसंपर्क कार्यालय द्वारा बी. बी. मेश्राम, साकेत नगर (पेठे नगर), छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जेणेकरून फुले शाहू आंबेडकराईट चळवळीचे संघटनात्मक कार्यात वृद्धी होऊ शकेल.



       या कार्यशाळेचे उदघाटन समाज चिंतक योगीराज आनंद यांनी केले. ते म्हणाले की, समतामुलक समाज व्यवस्थेचे निर्माण कार्य म्हणजे भारताच्या संविधानाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे होय. मानवतावादाच्या उत्थानासाठी माणसांनी माणसाशी माणसाप्रमाणे वागण्याची आवश्यकता आहे. एखाद्या जंगलाला आग लागलेली असताना एक चिमणी चोचीत पाणी घेऊन जात असते. जिला इतर वेड्यात काढतात, यातून काय निष्पन्न होणार आहे? असे जेव्हा विचारले जाते तेव्हा ती म्हणते की, जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा किमान आग विझविण्याचा प्रयत्न करणा-यांच्या यादीत तरी नांव लिहिले जाईल. म्हणून समस्या निर्मूलनाच्या अनुषंगाने किमान प्रयत्न तरी केले पाहिजेत, जे कार्य या कार्यशाळेच्या माध्यमातून केले जात आहेत. याची जाणीव ठेवून आपण सहभागी होत राहिले पाहिजे.



         याप्रसंगी अँड. विलास रामटेके म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध, कबीर, फुले यांना वैचारिक गुरू मानले होते तर विद्या, स्वाभिमान आणि शील यांना उपास्य दैवत मानले होते. त्यांना विरोधी लोक सुद्धा का घाबरतात? असे विचारले असता त्यांनी शील, चारित्र्याला जपल्यामुळे असे होत असल्याची जाणीव करून दिली आहे. टी. एन. थोरात म्हणाले की, फुले दाम्पत्यांना प्रस्थापितांनी फार त्रास दिला. सावित्रीबाई यांना शिकवायला जात असताना शेण माती अंगावर झेलावी लागली. कबीराने दगड धोंडयातील देव नाकारले. वेळेचे भान ठेवून बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. याप्रमाणे मार्गक्रमण करावे. संघराज धम्मकिर्ती म्हणाले की, अर्धवट ज्ञानावर मार्गक्रमण करून चालणार नाही, ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाल्यासारखे होईल. स्वाभिमानी व्यक्ती बनण्यासाठी चिखलाला आकार देऊन जसे मडके बनविले जाते, तसे विद्या व शीलाच्या बळावर जीवनाला आकार दिला पाहिजे. डॉ. रमेश धनेगांवकर म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांना केळुसकर गुरूजींनी भेट दिलेले बुद्ध चरीत्र आणि रामजी बाबांनी वाचायला लावलेले रामायण महाभारत यात तफावत आढळल्याने त्यांना वैचारिक बंड करण्याची प्रेरणा मिळाली. सात आसरा, मरीआई, खंडोबा असे अनेक आमचे दैवते आहेत. मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या उपास्य दैवत मात्र फारच वेगळे होते.

           प्रमुख वक्ते इंजिनियर मुकुल निकाळजे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वसा घेऊन आपण पुढे गेले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हिरक महोत्सवानिमित्त 1,18,000 रुपयाची थैली अर्पण करण्यात आली होती, जी त्यांनी आरोग्यावर खर्च करावी अशी जनते मार्फत आयोजकांची अपेक्षा असताना सुद्धा त्यांनी इमारत फंडाला दान दिली. यातून त्यांच्या उच्च कोटीच्या स्वाभीमानाची जाणीव होते.

      या कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप करताना फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे संचालक बी. बी. मेश्राम म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 28 आक्टोबर 1954 ला हिरक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिली जाणारी एक लक्ष अठरा हजारांची थैली इमारत फंडाला स्थानांतरित करताना स्पष्ट केले होते की, ' माझ्या सारख्या बॅरिस्टरने आपल्या निढळाच्या घामाने जमविलेला गरीब जनतेचा पैसा स्विकारने बेशरमपणाचे आहे. 

' डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्याचा धम्म स्वीकारण्यापूर्वी पी. लक्ष्मी नरसू यांनी लिहलेल्या इसेन्स आफ बुद्धीजम या पुस्तकाला स्वतंत्र प्रस्तावना लिहिली, यातून बुद्धाला सखोल चिंतनाने स्विकारले आहे. फुल्यांनी राईट्स आफ मॅन असे ग्रंथ लिहिणा-या थाॅमस पेन यांचेकडून प्रेरणा घेतली होती. यातून मानवतावादाची तीव्रता किती खोलवर रुजलेली आहे. याची जाणीव झाल्याने फुल्यांना स्विकारल्या गेले असावे. तसेच आंबेडकर घराणे कबीर पंथी असल्याने चिकित्सेला प्राधान्य दिले गेले म्हणून कबीराना स्विकारल्या गेले असावे. हे अनेक कारणांचे सार आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्या, स्वाभिमान व शील या वैचारिक मूल्यांना उपास्य दैवत म्हटले असून 12 व 13 फेब्रुवारी 1938 ला मनमाड येथील भाषणात स्पष्ट केले आहे की, शिक्षण घेतलेल्या माणसाच्या अंगी शील व सौजन्य नसेल तर तो हिंस्र पशू पेक्षाही क्रूर व भीतीप्रद समजण्यात यावा. यावरून उपास्य दैवतांवरील भावना आपल्या लक्षात येते. येथील बुद्धाला स्विकारताना बुद्ध समजून घेण्यासाठी "बुद्ध आणि त्यांचा धम्म" असे जाणीवपूर्वक लिहिले असताना 'भगवान बुद्ध' असा का उल्लेख केला जातो? याची आपण मिमांसा केली पाहिजे. म्हणजे योग्य दिशेने वाटचाल करता येईल.

         या कार्यशाळेला अँड. व्ही. डी. रामटेके, साधू आनंद, टी. एन. थोरात, कैलास तिरपुडे, बी. बी. मुजमुले, प्रकाश ससाने, गौरव काशिदे, संघराज धर्मकिर्ती, डॉ. रमेश धनेगांवकर, इंजिनिअर मुकुल निकाळजे, योगीराज आनंद इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post