छत्रपती संभाजी नगर : समाज जीवनात कार्यरत फुले शाहू आंबेडकराईट विचारधारेच्या हितचिंतकांना, जनतेला जागृत करण्यासाठी 25 नोव्हेंबर 1956 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुलगंध कुटी, सारनाथ येथे म्हटल्याप्रमाणे "माणसा माणसातील संबंध प्रेम, करुणा या तत्त्वानुसार जोडणा-या बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत समता आहे." या विधानाची प्रासंगिकता लक्षात घेऊन विधानाच्या 67 व्या वर्धापनदिनानिमित्त या ज्वलंत विषयावर बामसेफ अंतर्गत फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलच्या वतीने जनसंपर्क कार्यालय : द्वारा बी. बी. मेश्राम, साकेत नगर (पेठे नगर), छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र येथे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जेणेकरून फुले शाहू आंबेडकराईट चळवळीचे संघटनात्मक कार्यात वृद्धी होऊ शकेल.
या कार्यशाळेचे उदघाटन तथागत मासिकाचे कार्यकारी संपादक प्रा. अरुण कांबळे म्हणाले की, मुलगंध कुटी येथे पंच वर्गीय भिक्कुना संदेश दिला होता. बुद्धाच्या विचाराच्या प्रचार प्रसारासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रयत्नशील होते. जगाला शांततेची गरज आहे करिता आपण डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बुद्ध की कार्ल मार्क्स, जाती निर्मुलन, भारताचे संविधान आणि सारनाथ येथील भाषण समजून घेण्याची नितांत आवश्यकता आहे. ज्यामुळे मानवीय समाज निर्माण होऊ शकेल. समाजातील डाक्टरेट झालेले उच्च शिक्षित व्यक्ति येथे राहतात पण ते सुखी नाहीत कारण लोकशाहीत माणसे समान झालीत पण कागदावर होय, प्रत्यक्षात काय? परिणामी समाजात सामाजिक लोकशाही निर्माण झाली नाही तर त्यापासून त्रस्त व्यक्ती राजकीय लोकशाहीचा डोलारा उध्वस्त करतील. राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरूकिल्ली आहे, ती नीट सांभाळली पाहिजे. अठरापगड जातीतील लोकांना सामावून घेतले पाहिजे. भारताचे संविधानानुसार समता, ममता, करुणा निर्माण केली पाहिजे.
याप्रसंगी अँड. विलास रामटेके म्हणाले की, धम्मेक स्तुपासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा सत्कार करण्यात आला होता. जसे समुद्रात विलिन झाल्याने सर्व नद्यांचे अस्तित्व संपुष्टात येते. तसेच धम्मात आल्याने सर्व जातींचे अस्तित्व संपुष्टात येते. प्रसेनजित राजाला मुलगी झाल्याचे कळल्यावर त्यांचा चेहरा पडला होता. ही लिंगभेदरेषा आपणास संपुष्टात आणावी लागेल. जगातील एका माणसाने दुसऱ्या माणसांशी उचित व्यवहार करने म्हणजे धम्म होय. हिरामण अहिरे म्हणाले की, भारतात प्रतिक्रांती झाल्यावर धम्माचा अस्त झाला आणि जगाला बुद्धाची गरज भासली. जगातील प्रगतीशील राष्ट्रात लिंगाधारित समता सुद्धा पहायला मिळते. मात्र आपल्या देशात ज्ञानापासून जनतेला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो, हे धोकादायक आहे.
प्रमुख वक्ते धनराज गोंडाणे म्हणाले की, विचारमंथन करने ही एक चांगली बाबआहे. वैदिक संस्कृतीने भेदाभेद निर्माण केलेत, ज्याचे दुष्परिणाम आपल्यावर होत आहेत. नंतर प्रज्ञा, शील, करुणा, समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित श्रमण संस्कृती पुढे आली. जे तत्त्वज्ञान डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाकडून स्विकारले. महिलांचा भिक्खू संघात समावेश होणे ही एक महत्वपूर्ण क्रांती आहे. गरीब श्रीमंतातील दरी नष्ट करताना माणसांनी माणसाशी माणसाप्रमाणे वागले पाहिजे. मानवतावाद हाच धम्म आहे.
या कार्यशाळेचा अध्यक्षीय समारोप करताना फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कलचे संचालक बी. बी. मेश्राम म्हणाले की, अनेक जण दोन दोन कोटीचे बंगले बाधतात पण करुणा शून्य जीवन जगतात, अशावेळी समाजात समता कशी प्रस्थापित होईल? डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या यशस्वी कामकाजाच्या पूर्वावर्ती शक्ती समजावून सांगताना पहिली अट ही समाजातून विषमतावाद अर्थात ब्राह्मणवादाचे उच्चाटन सांगितले आहे तर विरोधी मतप्रवाहाचे अस्तित्व मान्य करने ही द्वितीय अट सांगितली आहे. याचे अनुपालन केले तरच समता प्रस्थापित होऊ शकेल, म्हणून आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. बुद्ध कबीर भीमराव फुले, त्यांनी जनजीवन फुलविले असे वामनदादा कर्डक म्हणाले होते. करिता ख-या अर्थाने बुद्धत्वावर आपण विचार केला पाहिजे. जेणेकरून समाजात समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्यायावर आधारित समाजव्यवस्था निर्माण करता येईल. म्हणून तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी! याचा सातत्याने प्रचार प्रसार केला तरच समाजात समता निर्माण करून भारताचे संविधानाला अपेक्षित प्रगल्भ समाज निर्माण करता येईल. करिता आपणास प्रयत्न करावे लागतील.
या कार्यशाळेला प्रा. अरुण कांबळे, हिरामण अहिरे, धनराज गोंडाणे, अँड. विलास रामटेके, बी. बी. मेश्राम इत्यादी प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनी विषयाच्या अनुषंगाने आपले मनोगत व्यक्त केले आहे. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली.