सोयाबीन पिकाच्या नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांना मदत करा

 



महसूलमंत्री विखे पाटील यांना निवेदन सादर करीत शेतकरी संघटनेची मागणी


          

चंद्रपूर / चिमूर , सुनिल कोसे     महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात सोयाबीन पिकाच्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यावरआले असता ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकांचे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी श्रीजय अॅग्रो एजन्सी, चिमूरचे संचालक  जितेश खेमराज इसनकर आणि शेतकरी संघटनेच्या वतीने महसूल मंत्र्यांना निवेदन देत शेतकऱ्यांची बाजू मांडली. 


                 चिमूर तालुक्यात पावसामुळे कपाशीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान सोयाबीनचे झाले असून सोयाबीनवर येलो मोझॉक तसेच खोडमाशीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला आहे. यामुळे दाणे भरण्याची क्रिया बाधित झाली. शेतकऱ्यांचे ८० टक्केपर्यंतचे नुकसान झाले आहे. परिणामी केवळ २० टक्केहूनही कमी उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती येईल. सोयाबीन पिकाच्या मशागतीचा खर्चही निघणे शेतकऱ्यांना दूरपास्त झाले आहे, अशी व्यथा शेतकरी वर्गानी महसूल मंत्र्यांना सांगितले. 


                सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीची सरकारने तत्काळ दखल घ्यावी व दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबतचे निवेदन महसूलमंत्री मा. विखे पाटील यांना दिले व शेतकऱ्यांना मदत करण्याची विनंती केली. यावेळी शेतकरी संघटनेचे डॉ. हेमंत इसनकर, चिमूर मंडळ भाजपा अध्यक्ष राजू पाटील झाडे, मोरेश्वर डंभारे, शंकर दांडेकर, अरुण बगने आणि अनेक शेतकरी वर्ग उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post