क्रिकेटच्या मैदानातून निर्माण झाली खुन्नस... राजुरामध्ये तीन मित्रांनी केला एका युवकावर चालू हल्ला..

 






चंद्रपूर, अमृत कुचनकर: क्रिकेटच्या मैदानातून निर्माण झालेली खुन्नस भलत्याच वळणावर गेली. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवणारे युवा खेळाडू पीचवर बॅटिंग, बॉलिंग करण्याऐवजी कटकारस्थान करण्यात गुंतले.


एवढेच काय, त्यांनी प्रतिस्पर्धी संघातील एका युवकावर चायनिज चाकूने हल्ला चढवला. त्यानंतर भरधाव ट्रेन पकडून आरोपी नागपुरात पळून आले. मात्र, पोलिसांनी त्यांचा ऑनलाइन पाठलाग करून अवघ्या काही तासातच त्यांना जेरबंद करत त्यांचा त्रिफळा उडवला.


एखाद्या चित्रपटातील प्रसंग वाटावा, अशी ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील होय. या घटनेतील फरार आरोपींच्या नागपूर रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे पोलिसांनी मुसक्या बांधल्या. यानंतर प्राथमिक तपासात उघड झालेल्या माहितीतून पोलिसही चक्रावले.


आशीष, परवेज आणि करण अशी आरोपींची नावे आहेत. हे सर्व राजूरा (जि. चंद्रपूर) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत. १८ ते २२ वयोगटातील या युवकांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेमच आहे. पोलिसांच्या माहितीनुसार त्यांचे शिक्षणही फारसे नाही. मात्र, ज्या पद्धतीने त्यांनी कटकारस्थान करून गुन्हा केला, ती पद्धत चक्रावून टाकणारी आहे.


एकाच परिसरात राहणाऱ्या तरुणांसोबत ते क्रिकेट खेळायचे. प्रतिस्पर्धी संघातील एक खेळाडू त्यांना नेहमी डिवचत होता. मात देण्याचा प्रयत्न करत होता. त्याला चांगली बॉलिंग, बॅटिंग करून प्रत्युत्तर देण्याऐवजी आरोपींनी भलतेच कट कारस्थान रचले. त्याला धडा शिकविण्यासाठी आरोपींनी फ्लिपकार्टवरून चाकूची मागणी नोंदवली. ऑनलाइन चाकू आल्यानंतर त्या तरुणाला एकटे गाठले आणि त्याच्यावर चाकू हल्ला करून जबर जखमी केले. दरम्यान, हल्ला केल्यानंतर आरोपींनी ठरल्याप्रमाणे चंद्रपूर रेल्वेस्थानक गाठले. तेथून ट्रेन पकडून ते नागपूरला पळून आले.


पळून आले अन् गजाआड झाले


तिकडे जखमी तरुणाने दिलेल्या बयाणावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचे लोकेशन ट्रेस केले. ते रेल्वेने नागपूरला पळून गेल्याचे कळताच चंद्रपूर पोलिसांनी नागपूर रेल्वे पोलिसांना त्यांचे फोटो, नंबर पाठविले. त्या आधारे येथील रेल्वेच्या ठाणेदार मनीषा काशिद तसेच पोलिस उपनिरीक्षक झुरमुरे, पोलिस हवालदार धनदर, नायक डोळस, कॉन्स्टेबल धोंगडी आणि कॉन्स्टेबल अडकणे यांनी आरोपींना शोधून त्यांच्या रेल्वेस्थानक परिसरात त्यांच्या मुसक्या बांधल्या.

Post a Comment

Previous Post Next Post