मनसे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वात आंदोलन
चंद्रपूर, अमृत कुचनकर: गडचांदूर एमएसईबी उपविभाग कार्यालयाकडून होत असलेल्या अनियमित वीजपुरवठ्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्या नेतृत्वाखाली गडचांदूर एमएसईबी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केला होता. मोर्चात गडचांदूर, नांदा येथील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर, नांदा, आवारपूर, बीबी आणि परिसर या गावांना गडचांदूर एमएसईबी कडून वीज पुरवठा केला जातो. सध्या या कार्यालयाचे काम रामभरोसे सुरू आहे. दर तासाला वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विजेच्या लपंडावाने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. शंभर टक्के वीज बिल वसुली होऊनही ग्रामीण भागात ही परिस्थिती निर्माण होत आहे. या संदर्भात मनसेचे जिल्हाध्यक्ष मनदीप रोडे यांच्याकडे अधिकाऱ्याशी संपर्क साधून प्रतिसाद न दिल्याची तक्रार करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष रोडे यांनी स्थानिक नागरिकांना घेऊन जनभावना लक्षात घेवून एमएसईबी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी अधिका-यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी न लावल्यास कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष मनदिप रोडे यांनी दिला. यावेळी मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते.