विदर्भ संपादक मिलिंद जामनिक,मूर्तिजापूर :- तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर नवसाळ शिवारातील शेरे बिहार या ढाब्यावर नोकराने मालकाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केल्याची घटना २६ जून रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली आहे .
राष्ट्रीय महामार्गावर नवसाळ शिवारात शेरे बिहार या नावाने ढाबा असून येथे काम करणाऱ्या ४० वर्षीय दूल्हाचंद नामक नोकर व मालक मोहम्मद शोएब मोहम्मद मुस्लीम अन्सारी वय ३८ वर्ष रा. हरचंदा जि . मूजफ्फरपूर बिहार हे दोघेजण लाकडे फोडत असताना त्यांच्यात किरकोळ वाद झाला . यावादात नोकर दूल्हाचंद याने मालक शोएब यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने दोन चार सपासप वार करून रक्ताच्या थारोळ्यात पाडले .या घटनेत ढाबा मालक मोहम्मद शोएब याचा घटनास्थळीच मृत्यू झाला . सदरच्या घटनेची माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत यांना मिळताच त्यांनी पोउपनी घनश्याम पाटील ,सहा पोउपनि दिलीप नागोलकर ,पो.का.राजेश डोंगरे , उमेश हरमकर , आकाश काळे , यांच्यासह सहकाऱ्यांने सोबत घेवून तात्काळ घटनास्थळी दाखल होताच त्यांना मृतक याचे शव हे ढाब्यालगत असलेल्या शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसून आले तर आरोपी दूल्हाचंद हा तिथेच उभा असलेला दिसून आला . पोलिसांनी आरोपीला त्वरीत पकडून अटक केली . घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे तसेच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी भेट दिली आहे .
याप्रकरणी माना पोलीस स्टेशन ला आरोपीच्या विरोधात भादवी ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास माना पोलीस करीत आहे .
राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या ढाब्यावर अनेक ठिकाणी वेडसर वृत्तीचे व्यक्ती काम करताना दिसून येते. आरोपी दूल्हाचंद हा वेडसर वृत्तीचा असल्याची माहिती ग्रामस्थांकडून मिळाली असून तो शेरे बिहार ढाब्यावर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून बिनपगारी काम करीत होता . घटनेपूर्वी मालकसोबत लाकडे फोडून झाल्यावर जेवण मागितले असता काही वाद उपस्थित झाल्याने ही हत्या झाल्याची चर्चा नागरिकामध्ये सुरू होती .