मान्सून पुर्व नाले सापसफाईचा मुहर्त केव्हा ? ; मूर्तिजापूर शहरवासीयांचा सवाल

 



पावसाळ्यापूर्वी ओढे , गटारीची स्वच्छता होणार का?स्वच्छतेअभावी आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर


    विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 


मूर्तिजापूर - पावसाळा थोड्या दिवसावर येऊन ठेपला असला तरी शहरातील विविध भागांतून जाणाऱ्या ओढ्यातील कचरा व गाळ अद्याप काढला गेलेला नाही. त्यामुळे एखादा पाऊस झाला तर पाणी तुंबून नागरी वस्तीत पसरते. त्यामुळे रोगराईचा धोका निर्माण होतो.

तेव्हा नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी युद्धपातळीवर ओढ्याची तसेच मोठ्या गटारींची तात्काळ साफसफाई करावी, अशी मागणी शहरवासीयांतून केली जात आहे.

ओढ्यात साचलेल्या कचऱ्यामुळे पाण्याची दुर्गंधी सुटली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागतो. तसेच आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. तेव्हा नगरपरिषदेच्या आरोग्य खात्याने ओढ्यातील प्लास्टिक कचरा, गाळ व झाडेझुडपे काढून ओढा स्वच्छ करावा, अशी मागणी होत आहे. शहरातून जाणाऱ्या ओढ्यांची स्वच्छता केली जात नाही. पावसाळा तोंडावर आला असतानाही मूर्तिजापूर शहरात अजून नालेसफाई करण्यात आलेली नाही.

या ओढ्यामध्ये गटारीचे मोठ्याप्रमाणात सांडपाणी मिसळते. एखादा मोठा पाऊस झाल्यानंतर गटारीतील सांडपाणी ओढ्यात साचून ओढाही तुंबतो. ओढ्यामध्ये मोठ्याप्रमाणात प्लास्टिक कचरा, मातीचा गाळ व झाडेझुडपे वाढली आहेत. मूर्तिजापूर शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामानाने सांडपाण्याचे व्यवस्थापन होणे आवश्यक आहे.

शहरात गेल्या पाच वर्षांपासून प्लास्टिक बंदी करण्यात आली आहे. तरीही लहान-मोठ्या गटारामध्ये प्लास्टिकच्या कचऱ्याचा खच मोठ्या प्रमाणात साचला आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही.

---------------------------------------- 

वर्षानुवर्षे गटारी तशाच

नगरपरिषदेच्या वतीने विविध स्तरावर पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपायोजना राबवून ओढ्याची साफसफाई करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे गटारी साफ केल्या जात नसल्यामुळे अनेक गटारी तुंबून गेल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी या गटारी स्वच्छ करणे ही गरजेचे आहे. याकडे परिषदेचा आरोग्य विभाग लक्ष देणार का, असा सवाल विचारला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post