शंभरहून अधिक ग्रामस्थांचे सामूहिक निवेदन; पहिली तक्रार दिशाभूल करून केल्याचा आरोप
श्रीक्षेत्र माहूर | माहूर तालुक्यातील चोरड-जुनापाणी ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या चौकशीवरून गावात राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची चौकशी करण्याची मागणी करणारा अर्ज काही नागरिकांनी १९ ऑक्टोबर २०२६ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती माहूर यांच्याकडे सादर केला होता. मात्र, या तक्रारीला विरोध दर्शवत ९ नोव्हेंबर २०२६ रोजी शंभरहून अधिक ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्यांसह सामूहिक निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात पहिली तक्रार दिशाभूल करून व राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने गावात विविध विकासकामे केली असून ती दर्जेदार स्वरूपाची आहेत. तसेच मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, असे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
जुनापाणी ते चोरड रस्ता तसेच गावठाण ते बंडू शामराव आडे यांच्या शेतापर्यंतचा रस्ता प्रत्यक्षात तयार करण्यात आला असून, या कामाबाबत खोटी तक्रार करण्यात आल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीमध्ये आदिवासी समाजाचा सरपंच असल्याने त्यांना राजकीय व मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने तक्रारी केल्या जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. पहिल्या तक्रारीतील मुद्दे खोटे असल्याने त्यांची दखल घेऊ नये, अशी मागणी सामूहिक निवेदनातून करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, पहिल्या तक्रारीतील काही अर्जदारांनीही आपली स्वाक्षरी दिशाभूल करून घेतल्याचे सांगत, सदर तक्रारीशी आपला संबंध नसल्याचे स्वतंत्र लेखी निवेदन दिल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्याही दबावाखाली न येता आपण हे निवेदन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या प्रकरणातील दोन्ही निवेदनांच्या प्रती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), नांदेड यांच्याकडेही पाठविण्यात आल्या आहेत.
आता ग्रामपंचायतीच्या विकासकामांबाबत वस्तुस्थिती काय आहे, तक्रारीत तथ्य आहे की राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, याची निष्पक्ष चौकशी होणार का? याकडे चोरड-जुनापाणीसह संपूर्ण माहूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. गटविकास अधिकारी या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


