कळंब तालुक्यातील एकलासपूर येथे ३.० रिश्टर स्केलचा भूकंप; परिसरात खळबळ!

 

Yavatmal Maharashtra India



कळंब तालुक्यातील एकलासपूर येथे ३.० रिश्टर स्केलचा भूकंप; परिसरात खळबळ!

सुदैवाने जीवित वा वित्तहानी नाही; जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क

विशेष प्रतिनिधी – सुनील धुर्वे

यवतमाळ : जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मौजा एकलासपूर येथे सोमवार, दि. ९ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून ०३ मिनिटांनी ३.० रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) नोंदीनुसार, या भूकंपाचे केंद्र जमिनीखाली सुमारे ५ किलोमीटर खोलीवर होते. सुदैवाने या भूकंपामुळे जिल्ह्यात कुठेही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क

भूकंपाचे केंद्र कळंब तालुक्यातील एकलासपूर परिसरात असल्याचे तांत्रिक नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. भूकंपाचे अक्षांश २०.४७० आणि रेखांश ७८.३५० असे नोंदविण्यात आले आहेत. अप्पर वर्धा व नागपूर येथील भूकंपमापक यंत्रांवर या भूकंपाची नोंद होताच जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतर्क झाले. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, तालुका स्तरावर परिसराची पाहणी व चौकशी सुरू करण्यात आली आहे.

नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

कळंब तालुक्यातील या परिसरात भूकंपाची नोंद झाल्याने नागरिकांमध्ये काही प्रमाणात चर्चा व खळबळ निर्माण झाली आहे. भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने अनेक ठिकाणी त्याचे धक्के प्रकर्षाने जाणवले नसल्याचे सांगण्यात येत आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जाऊ नये आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post