साईनाथ महाराज करणार शाळा महाविद्यालयात कीर्तन

 


महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालकांना आदेश ! भारतातील पहिली आनंददायी घटना 







श्रीक्षेत्र माहूर: माहूरच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कीर्तनसेवा समाजसेवा स्वच्छता अभियान वृक्ष लागवड यासह विविध समाजसेवांच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण करणारे राज्य शासनाचे स्वच्छता विभाग स्वच्छता दूत आयटीआय चे ब्रँड अँबेसिडर द.भ.प. राष्ट्रसंत श्री साईनाथ महाराज वसमतकर यांच्या कार्याची आता राज्यस्तरावर दखल घेतली गेल्याने त्यांच्या कीर्तनसेवेचा समाज सेवेचा स्वच्छता अभियानाचा लाभ महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना मिळवून देण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून पत्रव्यवहार करण्यात आला असून, आगामी उपक्रमांमध्ये त्यांच्या सेवेचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने संबंधित यंत्रणांना दिल्याने श्री साईनाथ महाराजांचे अभिनंदन होत आहे


देशात आजपर्यंत कुठल्याही संतांना अशा प्रकारची सेवा देण्याबाबत कुठल्याही सरकारने परवानगी दिली नाही महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम राबविण्यासाठी साईनाथ महाराजांची निवड केल्याने महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद घेणारे आदेश पारित झाले असून माहूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही बाब आहे त्यांच्या सामाजिक प्रबोधनाच्या कार्याला व्यापक व्यासपीठ मिळाले असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांचे सह खासदार आमदारांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ७ ऑक्टोबर २०२६ रोजी शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना यासंदर्भात पत्र पाठविले. त्यानंतर शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे येथून १५ ऑक्टोबर २०२६ रोजी विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी आणि संबंधित शिक्षण यंत्रणांना पत्राद्वारे पुढील कार्यवाहीसंदर्भात कळविण्यात आलेआहे


कीर्तनातून समाजप्रबोधनाचा व्यापक वसा

साईनाथ महाराज वसमतकर यांचे कार्य केवळ धार्मिक कीर्तनापुरते मर्यादित नसून सामाजिक जाणीव जागृत करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजविणे या व्यापक उद्देशांशी जोडलेले असल्याचा उल्लेख शासनाच्या पत्रात करण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छतादूत उपक्रमांतर्गत त्यांची नियुक्ती करण्यात आली असून,औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणूनही त्यांची नियुक्ती यापूर्वीच झाल्याचे पत्रात नमूद आहे.

जिल्हा परिषद शाळांचे परिसर स्वच्छ ठेवणे, विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे, राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत करणे, अंधश्रद्धा निर्मूलन, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती आणि भक्तिमार्ग या विषयांवर कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी प्रबोधन केल्याची नोंद संबंधित पत्रात आहे. या कार्यातून विद्यार्थ्यांना केवळ उपदेश नव्हे, तर जीवनमूल्ये आणि सामाजिक बांधिलकीची प्रेरणा मिळू शकते.


आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये, पर्यावरण संवर्धन, सामाजिक सलोखा आणि व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व समजावून सांगणे आवश्यक आहे. संत साहित्य आणि वारकरी परंपरेतील कीर्तन ही त्यासाठी प्रभावी माध्यमे ठरू शकतात. याच पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांच्या सेवेचा उपयोग करण्याची संकल्पना शासनाच्या पत्रव्यवहारातून पुढे आली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या पत्रानुसार, आगामी उपक्रमांत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या कीर्तनसेवेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्याबाबत प्रचलित शासन धोरणानुसार तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयानेही संबंधित विभागीय आणि जिल्हास्तरीय शिक्षण यंत्रणांना या संदर्भात सूचना दिल्या आहेत.


धार्मिक परंपरेचा वारसा जपत समाजातील विविध घटकांमध्ये सकारात्मक विचार रुजविण्याचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना शैक्षणिक क्षेत्राशी जोडणे ही काळाची गरज आहे. साईनाथ महाराज वसमतकर यांच्या कीर्तनसेवेचा विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी उपयोग झाल्यास शाळांमधील मूल्यशिक्षण, स्वच्छता जागरूकता आणि सामाजिक उत्तरदायित्वाच्या उपक्रमांना नवे बळ मिळू शकते.

माहूरच्या भूमीतून समाजप्रबोधनाचे कार्य करणाऱ्या महाराजांच्या सेवेची शासनस्तरावर दखल घेतली जाणे ही माहूर तालुक्यासाठी अभिमानाची बाबू ठरल्याने दभप राष्ट्रसंत साईनाथ महाराज वसमतकर यांच्या कार्याचे अभिनंदन होत असून नागरिकाकडून महाराष्ट्र शासनाने शिक्षण विभागात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी घेतलेल्या निर्णयाचेही अभिनंदन होत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post