लाखो भक्तांचे श्रद्धास्थान; केळापूरच्या जगदंबा देवी मंदिरात भक्तीचा जागर!

 




नवरात्रोत्सवात भाविकांची अलोट गर्दी; मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमला



केळापूर, तालुका प्रतिनिधी – राजेश सोयाम 

केळापूर: येथील प्रसिद्ध श्री जगदंबा देवी संस्थानात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. महाराष्ट्रासह परराज्यांतूनही हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी केळापूर येथे दाखल होत असून, मंदिर परिसरात भक्तीचा जागर पाहायला मिळत आहे.


केळापूरची श्री जगदंबा देवी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ख्याती आहे. देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी भाविकांची संख्या वाढत असून, नवरात्रोत्सवात मंदिरात विशेष उत्साहाचे वातावरण असते. यंदाही पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी रांगा लावत आहेत. मंदिरात विशेष महापूजा, आरती आणि विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येत आहे.


देवीचे मनमोहक रूप डोळ्यांत साठवण्यासाठी तसेच दर्शनाचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि शेजारील राज्यांतून भाविक खासगी वाहने व एसटी बसने येथे येत आहेत. ‘जय जगदंबा’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून जात असून, सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानाकडून दर्शन रांगा, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात केळापूरच्या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post