स्वच्छता दूत परवेज बेग मिर्झा यांचा पुढाकार; नागरिकांकडून उपक्रमाचे कौतुक
तालुका प्रतिनिधी विनोद आडे
आर्णी : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आर्णी नगर परिषदेचे स्वच्छता दूत परवेज बेग मिर्झा यांनी शास्त्रीनगर येथील दुर्गा देवी मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविली. नवरात्रीदरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना, विशेषतः महिलांना स्वच्छ व सुंदर वातावरण मिळावे, या उद्देशाने त्यांनी हा उपक्रम हाती घेतला.
नवरात्रोत्सवात मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते. ही बाब लक्षात घेऊन परवेज बेग मिर्झा यांनी स्वतः पुढाकार घेत मंदिर परिसर स्वच्छ करण्याचे काम केले. यासोबतच शहरातील प्रसिद्ध स्वयंभू महाकाली मंदिर परिसरातही स्वच्छता मोहीम राबविण्याचा त्यांचा मानस आहे.
धार्मिक स्थळांची स्वच्छता ही सामूहिक जबाबदारी
धार्मिक स्थळांची स्वच्छता राखणे ही केवळ नगर परिषदेची जबाबदारी नसून नागरिक आणि उत्सव मंडळांनीही त्यात सहभाग घेणे आवश्यक आहे, असे आवाहन परवेज बेग मिर्झा यांनी केले. शहरातील कोणत्याही दुर्गा उत्सव मंडळाच्या परिसरात अस्वच्छता आढळल्यास नागरिकांनी आपल्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
नवरात्रोत्सवाच्या काळात स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून, धार्मिक स्थळांची स्वच्छता राखण्यासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली जात आहे.

