पत्रकारांच्या निवेदनानंतर गडकरींचे ठोस आश्वासन; माहूरमधील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करणार
श्रीक्षेत्र माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१-अ वरील बहुतांश विकासकामे गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने अखेर हा प्रश्न थेट केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या दालनात पोहोचला आहे. माहूरच्या विकासकामांसाठी सातत्याने आवाज उठविणाऱ्या स्थानिक पत्रकारांच्या शिष्टमंडळाने ४ ऑक्टो. रोजी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी महामार्गावरील सर्व रखडलेली कामे तातडीने पूर्ण करून देण्याचे ठोस आश्वासन गडकरी यांनी दिले.
श्रीक्षेत्र माहूरगड ही भगवान दत्तात्रेय स्वामीं, श्री रेणुकामाता आणि अनुसया माता यांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेली भूमी आहे. येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मूलभूत विकासकामेच अपूर्ण असल्याने स्थानिक नागरिकांसह देशभरातून येणाऱ्या भाविकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
पत्रकारांनी सादर केलेल्या निवेदनात महामार्गावरील बंद अवस्थेतील पथदिवे, अपूर्ण नाली बांधकाम, प्रलंबित पेव्हर ब्लॉक, अंतर्गत रस्त्यांची अपूर्ण जोडणी तसेच मालवाडा घाटातील रखडलेली कामे यांसह अनेक गंभीर समस्यांकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. अनेक वर्षांपासून या कामांचा प्रश्न प्रलंबित असून, वारंवार मागणी करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. तीर्थक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या महामार्गाची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.माहूरच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या प्रश्नाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गांभीर्याने दखल घेतली. महामार्गावरील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून देण्याचे आश्वासन त्यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या महामार्गाच्या कामांना आता गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.दरम्यान, श्री दत्तशिखर संस्थानचे प. पू. प. म. डॉ. धनेश्वर भारतीजी महाराज यांनीही महामार्गावरील सर्व अपूर्ण कामे पूर्ण करण्याचा संदेश केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यापर्यंत पोहोचविला होता. महाराजांच्या त्या संदेशाला आदेश मानून त्यांनी आदरपूर्वक त्याचा स्वीकार केला.यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे, विजय आमले, अपील बेलखोडे, सुरेश गिऱ्हे, राज ठाकूर, भाजपचे माजी शहराध्यक्ष पुरुषोत्तम लांडगे आणि नवनीत देवपूलवार उपस्थित होते.


