शारदीय नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आढावा बैठक

 

          छायाचित्र : इलियास बावानी


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन; अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व पत्रकारांना उपस्थितीचे आवाहन





श्रीक्षेत्र माहूर : जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका देवी मंदिरातील शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. नवरात्रोत्सवाच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता श्री रेणुका देवी मंदिराच्या प्रांगणात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवाच्या काळात लाखो भाविक माहूर गडावर दर्शनासाठी येण्याची शक्यता असल्याने भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी वाहतूक, पार्किंग, दर्शन रांगा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वीज, आरोग्य, सुरक्षा तसेच महाप्रसादाच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात येणार आहे.

गडावर एसटी बसद्वारे होणारी प्रवासी वाहतूक, शहर व गडावरील पार्किंग व्यवस्था, व्हीआयपी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग, दर्शन रांगेतील भाविकांना आवश्यक सुविधा, श्री परशुराम मंदिरावरील अहोरात्र सुरू राहणारा महाप्रसाद, विद्युत व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, आरोग्य पथके व ॲम्बुलन्सची उपलब्धता याबाबत बैठकीत सविस्तर आढावा घेतला जाणार आहे.

तसेच ऐनवेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना, अग्निशमन व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीतील नियोजन यावरही विशेष चर्चा होणार आहे. गडावर सध्या लिफ्ट व स्कायवॉकचे काम सुरू असल्याने त्याचा भाविकांच्या वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबतही प्रशासनाकडून नियोजन केले जाणार आहे.

या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किनवट, जिल्हा समादेशक होमगार्ड, उपविभागीय पोलीस अधिकारी माहूर, आपत्कालीन कक्षाचे अधिकारी, एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, आरोग्य विभाग, धर्मदाय आयुक्त कार्यालय, अन्न व औषध प्रशासन, पुरातत्व विभाग, पंचायत समिती माहूर, पोलीस स्टेशन माहूर, नगरपंचायत माहूर तसेच श्री रेणुकादेवी संस्थानचे व्यवस्थापक आदी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

नवरात्र महोत्सवाचे नियोजन सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधवांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन माहूरचे तहसीलदार अभिजीत जगताप यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post