उपविभागीय कार्यालय महावितरण दर्यापूर येथे शेतकऱ्यांचा मोर्चा

 




दुष्काळात तेरावा महिना..! चार दिवसांपासून शेतीपंपांची वीज बंद; पिकांना पाणी देण्यास अडचणी


उपसंपादक| संतोष भालेराव

दर्यापूर : तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना मागील चार दिवसांपासून शेतीपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. लोड अधिक असल्याने फिडर वारंवार बंद पडत असल्याचे सांगण्यात येत असून, त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालय, महावितरण, दर्यापूर येथे मोर्चा काढून आपला रोष व्यक्त केला. शेतीपंपांची वीज वारंवार बंद होत असल्याने पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली.


दरम्यान, वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत महावितरणच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असून, त्यांच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा संतापही यावेळी व्यक्त करण्यात आला.


दुष्काळी परिस्थितीत पिके वाचविण्यासाठी पाण्याची नितांत गरज असताना वीजपुरवठा खंडित राहणे म्हणजे ‘दुष्काळात तेरावा महिना’ ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शेतीपंपांचा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करून फिडरची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post