तालुका प्रतिनिधी निजामोद्दिन सोलंकी
घाटंजी : आगामी गणेशोत्सव व दुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घाटंजी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात दि. १ सप्टेंबर रोजी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची शांतता समितीची बैठक उत्साहात पार पडली. यावेळी उत्सव शांततेत, शिस्तीत आणि सामाजिक सलोखा राखत साजरा करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून विविध सूचना देण्यात आल्या.
बैठकीत मार्गदर्शन करताना घाटंजी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक केशव ठाकरे यांनी गणेश मंडळांनी डीजेच्या कर्कश आवाजाला आळा घालून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे, तसेच सामाजिक ऐक्याचा संदेश देणारे उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले. उत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारे सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची मंडळांनी खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सवाच्या मिरवणुकीदरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्यासह मंडळांनी स्वयंशिस्त पाळावी आणि कोणत्याही अनुचित प्रकाराला थारा देऊ नये, अशा सूचना पोलिस प्रशासनाने दिल्या.
दरम्यान, मागील वर्षी उत्कृष्ट व समाजोपयोगी उपक्रम राबवून जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नेहरू नगर येथील बाल गणेशोत्सव मंडळ तसेच ग्रामीण भागातील एका गणेश मंडळाचा यावेळी प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी गणेशोत्सव हा धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा वाढविणारा उत्सव असल्याने तो शांततेत, उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करावा, असे आवाहन ठाणेदार केशव ठाकरे यांनी केले. पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी दिले.
बैठकीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राठोड, गोपनीय शाखेचे अमोल कोवे, ठाणेदारांचे रायटर दिनेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी तसेच विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
