सरपंच-ग्रामसेवकाने आधी पळवले शासकीय दप्तर; कारवाईच्या भीतीने तोंडावर हेल्मेट घालून कुलूप तोडताना पकडले रंगेहाथ!
माहूर तालुक्यातील गुंडवळ ग्रामपंचायतीमध्ये कोट्यवधींच्या विकासकामांत झालेल्या आर्थिक अपहार आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे दडपण्यासाठी सरपंचासह ग्रामसेवकाने चक्क शासकीय दप्तरच पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढ्यावरच न थांबता, तक्रार झाल्यानंतर कारवाईच्या भीतीने हादरलेल्या सरपंच आणि ग्रामसेवकाने तोंडावर हेल्मेट घालून, मध्यातंराच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयाचे कुलूप तोडून ते दप्तर पुन्हा आत ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, जागरूक ग्रामस्थांनी या दोघांनाही रंगेहाथ पकडून त्यांचा डाव उधळून लावला.
ग्रामसभेच्या दिवशीच शासकीय दप्तर गायब
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २७ ऑगस्ट २०२६ रोजी गुंडवळ येथे ग्रामसभा पार पडली. ग्रामसभा संपल्यानंतर दुपारी ११ ते १ या वेळेत सरपंच रामेश्वर किसन जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश करून अत्यंत महत्त्वाचे नमुना नंबर ८ (कर आकारणी नोंदवही), गृहकर पावती पुस्तके, जन्म-मृत्यू नोंदणी रजिस्टर, बँक पासबुके आणि विकासकामांच्या तांत्रिक अंदाजपत्रकांसह (Technical Estimates/MB) मूळ फायली बेकायदेशीरपणे पळवून नेल्या.
उपसरपंच राहुल कांबळे यांनी या बेकायदेशीर कृत्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता, सरपंच रामेश्वर जाधव यांनी, "तू माझ्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली आहेस, मी हे सर्व शासकीय दस्तावेज आणि रेकॉर्ड जाळून टाकीन" अशी थेट धमकी दिल्याची तक्रार दाखल झाली आहे.
हेल्मेट घालून कुलूप तोडताना रंगेहाथ पकडले!
याप्रकरणी ग्रामस्थ विठ्ठल प्रेमसिंग राठोड यांनी १ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी (BDO) आणि तहसीलदारांकडे तक्रार दाखल केली. तक्रार होताच आपले पद धोक्यात आल्याचे लक्षात येताच सरपंच रामेश्वर जाधव व ग्रामसेवक श्री. कनाके यांनी कट रचला.
२ सप्टेंबर रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास स्वतःची ओळख लपवण्यासाठी तोंडावर हेल्मेट घालून दोघे दुचाकीवरून आले. चोरीला नेलेले दप्तर लाल रंगाच्या गाठोड्यात बांधून, सील ठोकलेले ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून ते दप्तर आत ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच, विठ्ठल राठोड व ग्रामस्थांनी त्यांना रंगेहाथ पकडले. प्रत्यक्ष घटनास्थळी ग्रामसेवक कनाके यांनी गाठोड्यात शासकीय दप्तर असल्याची स्पष्ट कबुली दिली असून, या संपूर्ण थराराचे GPS लोकेशन, फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण ग्रामस्थांनी पुरावा म्हणून पोलिसांकडे सुपूर्द केले आहे.
कठोर फौजदारी कारवाईची मागणी
शासकीय दप्तराची चोरी करणे, पुराव्यांमध्ये फेरफार व बनावटगिरी करणे (Forgery), शासकीय मालमत्तेचा अपहार करणे आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS 2023) विविध कलमांनुसार व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३९ अन्वये सरपंचाला पदमुक्त करून दोघांवर तातडीने FIR दाखल करण्याची मागणी विठ्ठल राठोड यांनी पोलीस ठाणे माहूर, BDO व तहसीलदारांकडे केली आहे.
काय आहे प्रकरण? :
२७ ऑगस्ट: ग्रामसभेनंतर सरपंचाकडून मूळ तांत्रिक व आर्थिक दप्तर बेकायदेशीरपणे गायब.
२७ ऑगस्ट: अडवणाऱ्या उपसरपंचाला "दस्तऐवज जाळून टाकीन" अशी सरपंचाची धमकी.
०१ सप्टेंबर: भ्रष्टाचाराची चौकशी व दप्तर जप्तीसाठी BDO व तहसीलदारांकडे तक्रार.
०२ सप्टेंबर: ओळख लपवून हेल्मेट घालून कुलूप तोडताना सरपंच व ग्रामसेवक रंगेहाथ पकडले!
पुरावा नष्ट करण्याचा कट! ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. सखोल तांत्रिक व आर्थिक ऑडिट झाल्यास चौकशीत अडकू, या भीतीनेच (Mens Rea) हे दप्तर पळवून त्यात खाडाखोड व बनावट नोंदी करण्याचा कट रचला गेल्याचा आरोप आहे.
आरोपी: १. रामेश्वर किसन जाधव (सरपंच, गुंडवळ) २. श्री. कनाके (ग्रामसेवक, गुंडवळ)
तक्रारदाराची प्रतिक्रिया: "ग्रामपंचायतीच्या निधीचा हिशोब मागितला म्हणून शासकीय रेकॉर्ड पळवले गेले. पुरावे नष्ट करण्यासाठी कुलूप तोडणाऱ्या भ्रष्ट कारभाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कडक कारवाई झालीच पाहिजे!" - विठ्ठल प्रेमसिंग राठोड (तक्रारदार नागरिक, गुंडवळ)

