गणेशोत्सव पारंपरिक वाद्यांनी साजरा करा : सपोनि संतोष जोंधळे

 






सिंदखेड : आगामी श्रीगणेशोत्सव पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि डॉल्बीमुक्त पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांनी केले.

दि. ७ सप्टेंबर रोजी सिंदखेड येथे आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशोत्सव शंभर टक्के डॉल्बीमुक्त करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशानुसार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश मंडळांनी ‘एक गाव, एक गणपती’ला प्राधान्य देऊन अकरा दिवस समाजप्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत. मिरवणुकीत ढोल, ताशे, लेझीम, झांज, टाळ-मृदंग यांसारख्या पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे. ध्वनीमर्यादा व वेळेच्या नियमांचे पालन करून मिरवणूक वेळेत पूर्ण करावी, तसेच लहान मूर्तीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

मिरवणुकीतील वाहनांचे इन्शुरन्स व चालकाचा परवाना बंधनकारक असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही जोंधळे यांनी दिला.

बैठकीला सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळांचे पदाधिकारी, डीजे चालक-मालक, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post