तालुका प्रतिनिधी निजामोद्दिन सोलंकी
शिरोली : युवासेना जिल्हाप्रमुख आकाश राठोड यांच्या पुढाकारातून शिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल **३५२ नागरिकांची नेत्र तपासणी** करण्यात आली.
महात्मे नेत्रपेढी व नागपूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची तपासणी केली. तपासणीदरम्यान **१३२ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र** आढळले असून, त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
पालकमंत्री संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरातून परिसरातील आर्थिक परिस्थितीमुळे महागडे उपचार घेणे शक्य नसलेल्या गरजू नागरिकांना मोठा आधार मिळाला. तपासणीनंतर रुग्णांना आवश्यक उपचार व पुढील शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी संत श्री शहापुरी महाराज उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख आशिष पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, माजी सभापती अभिषेक पाटील ठाकरे यांच्यासह शिवसेना नेते नारायण भोयर, माजी सरपंच गुणवंत लेंगुरे, गुरुदेव येडके, निलेश जुनघरे, सागर वाकोडे आदी उपस्थित होते.
संत तुकाराम महाराजांच्या सेवाभावी विचारांपासून प्रेरणा घेऊन आकाश राठोड यांच्या माध्यमातून दरवर्षी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविले जातात. आर्थिक परिस्थितीमुळे कोणताही गरजू व्यक्ती उपचारापासून वंचित राहू नये, या उद्देशाने हे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आकाश राठोड यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
