Right to Information | पशुवैद्यकीय कार्यालयावर माहिती अधिकार अर्जदाराचा गंभीर आरोप

 

पशुवैद्यकीय दवाखाना आमला विश्वेश्वर, चांदूररेल्वे अमरावती


चांदूर रेल्वेतील पशुवैद्यकीय कार्यालयावर माहिती अधिकार अर्जदाराचा गंभीर आरोप

RTI

30 दिवस उलटूनही माहिती नाही; प्रथम अपीलानंतर 7 दिवसांत माहिती देण्याचे आश्वासनही हवेत!


विभागीय संपादक /निलेश रामगावकर 

अमरावती,चांदूर रेल्वे : माहिती अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत मागितलेली माहिती विहित मुदतीत न मिळाल्याने कारला येथील अर्जदार देवेंद्र योगेंद्र भोंडे यांनी पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Devendra Bhonde  यांनी 19 मे 2026 रोजी पशुवैद्यकीय दवाखाना, आमला विश्वेश्वर, ता. चांदूर रेल्वे येथे माहिती अधिकार अर्ज दाखल केला होता. या अर्जातून कारला ग्रामपंचायत क्षेत्रातील दूधाळ जनावरांची संख्या, लसीकरण मोहिमेचा तपशील, पशुवैद्यकीय दवाखान्यातील औषध साठा तसेच कारला परिसरात वितरित करण्यात आलेल्या औषधांची लाभार्थीनिहाय माहिती मागण्यात आली होती.

मात्र, अर्ज दाखल केल्यानंतर कायद्यानुसार अपेक्षित कालावधीत माहिती मिळाली नसल्याने देवेंद्र भोंडे यांनी 1 जुलै 2026 रोजी प्रथम अपील दाखल केले.

त्यानंतर 29 जुलै 2026 रोजी प्रथम अपीलाची सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान जनमाहिती अधिकारी तथा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल मुरकर यांनी पावसाळ्याचे दिवस आणि लसीकरण मोहीम अत्यावश्यक काम म्हणून सुरू असल्यामुळे माहिती देण्यास विलंब झाल्याचे सांगितल्याचा दावा अर्जदाराने केला आहे. तसेच मागितलेली माहिती उपलब्ध असून ती 7 दिवसांच्या आत देण्यात येईल, असे सुनावणीदरम्यान सांगण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

मात्र, त्यानंतरही 20 ते 25 दिवस उलटून माहिती मिळाली नसल्याचा आरोप अर्जदाराने केला आहे. त्यामुळे माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत  देवेंद्र भोंडे यांनी संबंधित प्रकरणाची कायदेशीर व प्रशासकीय चौकशी, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई आणि आवश्यक असल्यास फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आता पशुसंवर्धन विभाग या तक्रारीवर कोणती भूमिका घेतो आणि अर्जदाराला मागितलेली माहिती कधी मिळते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post