पत्रकारावर प्राणघातक हल्ला; आरोपींवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा




नांदेड


नांदेड,माहूर : माहूर तालुक्यातील शेकापूर येथे ग्रामसभेदरम्यान ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित केल्याच्या कारणावरून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता समाधान कांबळे यांच्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महेश अशोकराव कांबळे यांच्या तक्रारीवरून चौघांसह इतर व्यक्तींविरुद्ध माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेकापूर ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकार समाधान कांबळे यांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजातील विविध बाबी, झालेली कामे तसेच हिशोब ग्रामसभेसमोर सादर करण्याची मागणी केली. यावरून वाद निर्माण झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

तक्रारीनुसार, सुनील नामदेवराव बेहरे यांनी समाधान कांबळे यांच्याविरुद्ध इतरांना चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर गणेश नामदेव राठोड व विवेक गणेश राठोड यांनी जातीवाचक शिवीगाळ करत समाधान कांबळे यांच्यावर हल्ला केला. महेश कांबळे यांनी भावाला वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पकडून ठेवण्यात आले आणि विवेक राठोड याने लोखंडी रॉडने समाधान कांबळे यांच्या डोक्यात मारल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दरम्यान, रामेश्वर चव्हाण यांच्यासह अन्य काही व्यक्तींनी हल्लेखोरांना चिथावणी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या हल्ल्यात समाधान कांबळे गंभीर जखमी झाले. त्यांना प्रथम माहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी माहूर पोलीस ठाण्यात एफआयआर क्रमांक ०१६०/२०२६ नोंद करण्यात आला आहे. तक्रारीनुसार भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमातील कलम ३(१)(आर), ३(१)(एस) आणि ३(२)(व्हीए) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्रकारावर झालेल्या या हल्ल्याचा पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत असून, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post