प्रतिनिधी,श्रीकांत राऊत
काऊरवाडी : पाटबंधारे विभागाअंतर्गत मौजे काऊरवाडी येथे मायनरचे काम सध्या सुरू आहे. मात्र, या कामासाठी सुरू असलेल्या अवजड वाहनांची वाहतूक व यंत्रसामग्रीच्या वापरामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून तयार केलेल्या पांदन रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी लोकवर्गणी जमा करून मोठ्या प्रयत्नांतून हा पांदन रस्ता तयार केला होता. मात्र, मायनरच्या कामासाठी अवजड वाहनांची सातत्याने ये-जा सुरू असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पावसामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मायनरचे काम पूर्ण करताना खराब झालेल्या पांदन रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची पाहणी करून आवश्यक उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
