चांदूर बाजार : शिरजगाव कसबा परिसरात पुन्हा एकदा वाघिणीच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली असून, शेतात काम करणारे दिनेश आवारे (वय ४५, रा. केणीपुरा, शिरजगाव कसबा) यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, कालच सोनोरी येथे वाघिणीच्या हल्ल्यात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा नागरिकाचा बळी गेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाघिणीचा सातत्याने वावर असल्याने शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हा प्रशासन आणि वनविभागाने तातडीने वाघिणीला पकडण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सलग दोन दिवसांत दोन नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा नेमकी कुठे आहे? आणखी किती नागरिकांचा बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वनविभागाने तातडीने परिसरात शोधमोहीम राबवून वाघिणीचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
