गायीच्या उपचाराबाबत पशुवैद्यकीय डॉक्टरांविरोधात चौकशीची मागणी

 



₹85 हजारांच्या गायीचे दूध उत्पादन 24 लिटरवरून 1 लिटरपेक्षा कमी झाल्याचा दावा; जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे तक्रार


विभागीय संपादक/ निलेश रामगावकर 

अमरावती : सुपलवाडा, ता. चांदूर रेल्वे येथील नरेंद्र राजेंद्र ठाकरे यांनी पशुवैद्यकीय डॉक्टर श्री. चंद्रकांत देशमुख यांच्या उपचाराबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून स्वतंत्र तज्ज्ञ चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या अंदाजे ₹85 हजार किंमतीच्या गायीचे उपचारापूर्वी दररोज सुमारे 24 ते 25 लिटर दूध उत्पादन होत होते. गायीच्या उपचारासाठी त्यांनी डॉक्टर देशमुख यांना घरी बोलावले. डॉक्टरांनी तीन उपचारांनंतर गाय बरी होईल, असे सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मात्र, चार वेळा उपचार करूनही गायीची प्रकृती पूर्ववत झाली नसून सध्या दूध उत्पादन दररोज 1 लिटरपेक्षाही कमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

उपचारासाठी 14 ते 18 सप्टेंबरदरम्यान PhonePe द्वारे एकूण ₹5,000 अदा केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. उपचारादरम्यान गायीच्या आजारानुसार योग्य निदान व उपचार झाले का, तसेच वापरण्यात आलेली औषधे आणि त्यांची मात्रा योग्य होती का, याची तज्ज्ञांकडून तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तक्रारदाराने डॉक्टरांची शैक्षणिक पात्रता, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद नोंदणी व उपचार करण्याचा कायदेशीर अधिकार तपासण्याची मागणी केली आहे. तसेच गायीची शासकीय पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून तातडीने तपासणी करून दूध उत्पादनातील घट व संभाव्य आर्थिक नुकसानीचे मूल्यांकन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तळेगाव दशासर पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांची भेट घेतल्यानंतर विभागीय चौकशीसाठी प्रथम पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार करण्याचा सल्ला मिळाल्याचे तक्रारदाराने सांगितले. चौकशीअंती अहवाल पोलिसांकडे सादर झाल्यास पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

निष्काळजीपणा किंवा चुकीचा उपचार तज्ज्ञ चौकशीत सिद्ध झाल्यास लागू कायद्यानुसार कारवाई करून सिद्ध झालेल्या आर्थिक नुकसानीबाबत योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी नरेंद्र ठाकरे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post