स्वतःचे हक्क मिळवायचे असेल तर संघर्ष करावाच लागेल - गौतम गजभिये, सचिव - गवंडी बांधकाम मजदूर युनियन धा. रे.
विभागीय संपादक/निलेश रामगावकर
धामणगाव रेल्वे : बांधकाम कामगार यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध तसेच शासनाकडून बंद करण्यात आलेल्या योजना पूर्ववत सुरु करण्यासाठी दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी अमरावती येथे बांधकाम कामगार हक्क संघर्ष समितीच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. बांधकाम कामगार हक्क संघर्ष समिती ही सातत्याने कामगाराच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत संघर्ष करीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला कामगारांचा महामोर्चा यशस्वी करण्याकरिता धामणगाव रेल्वे येथे दि. २५ संप्टेंबर रोजी आढावा बैठक घेण्यात आली.
सदरच्या बैठकीत कामगार हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय मांडवधरे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मेश्राम, जयेंद्र भोगे, प्रज्ञाताई बन्सोड यांची प्रमुख उपस्थित होती. यावेळी संजय मांडवधरे यांनी उपस्थित बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना म्हटले कि, शाषनातर्फे सुरु असलेल्या योजना या पूर्णपणे बंद करण्यात आल्या असताना मोठ्या प्रमाणात कामगारांवर अन्याय होत आहे. त्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम आपल्याला करायचे. आणि त्यासाठी संघर्ष अटळ आहे. आपल्याला आयते कुणीही आणून देणार नाही ते आपल्याला आपल्या संघर्षातून स्वतः हस्तगत करायचे आहे. त्याकरिता शांत राहून जमणार नाही तर सरकारला जागे करून आपले हक्क अधिकार आपल्याला मिळवून घ्यायचे आहे. म्हणून जास्तीत जास्त संख्येने महामोर्चामध्ये सहभागी होऊन महामोर्चा यशस्वी करा.
सदरच्या बैठकीला धामणगाव सह इतर गावातील असंख्य बांधकाम कामगार यांची उपस्थित होती. यावेळी सदरच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन जयेंद्र भोगे यांनी केले तर आभार प्रदर्शन गौतम गजभिये यांनी केले.
