श्री संत शहापुरी महाराज मठातील दानपेटीची चोरी; भाविकांमध्ये संताप

 

महाराष्ट्र पोलीस


घाटंजी | तालुका प्रतिनिधी


झटाळा–तरोडा फाटा येथील श्री संत शहापुरी महाराज मठातील दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यामधील रोख रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मठ उघडल्यानंतर दानपेटी फोडलेली असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मठ प्रशासनाने तात्काळ पारवा पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व तपासाची चक्रे फिरवली.


या प्रकरणाचा पुढील तपास पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक गोपाल राठोड करीत आहेत. पोलिसांनी उपलब्ध पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा शोध सुरू आहे.


धार्मिक स्थळी घडलेल्या या चोरीमुळे भाविक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post