केळापूर : केळापूर तालुका तिरळे कुणबी समाज संघटना व केळापूर तालुका महिला तिरळे कुणबी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व यशवंत व्यक्ती सत्कार सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. राजूभाऊ तोडसाम होते.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री रणजितजी पाटील, पांढरकवडा नगराध्यक्ष अतिशजी बोरले, उपनगराध्यक्ष अतिश चव्हाण तसेच प्रमुख वक्ते वैभव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजातील यशवंत व्यक्तींचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष मा. प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी तिरळे कुणबी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाज भवन उभारण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही देत समाज भवन बांधून देण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळण्यासोबतच समाजातील एकोपा अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमास समाजबांधव, महिला, युवक-युवती, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


