Gavakadachi batmi network
ऐन खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना बळीराजा पुन्हा एकदा दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी पावसाची वाट पाहत आहे, तर दुसरीकडे बियाणे व खतांच्या वाढत्या किंमतींनी त्याचे कंबरडे मोडले आहे. "दरवर्षी संघर्ष फक्त शेतकऱ्यांच्याच नशिबी का?" असा संतप्त सवाल ग्रामीण भागातून उपस्थित केला जात आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बियाणे आणि खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी २,००० ते २,२०० रुपयांत मिळणारे सोयाबीन बियाणे आता ३,१०० ते ३,२०० रुपयांपर्यंत पोहोचले आहे. अवघ्या एका वर्षात झालेली सुमारे एक हजार रुपयांची वाढ शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडवणारी ठरत आहे. केवळ सोयाबीनच नव्हे, तर इतर शेती उपयोगी बियाणे आणि खतांच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे "खाणार काय आणि पेरणार काय?" असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
महागाईबरोबरच खतांच्या उपलब्धतेचाही प्रश्न गंभीर बनला आहे. अनेक ठिकाणी खतांची टंचाई निर्माण झाली असून, ती जाणीवपूर्वक निर्माण केली जात असल्याचीही चर्चा आहे. परिणामी, शेतकऱ्यांना शेतीची कामे बाजूला ठेवून कृषी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. दरवर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला अशा समस्या निर्माण होत असताना कृषी विभागाचे नियोजन नेमके काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत समस्या मांडण्यासाठी प्रशासन किंवा लोकप्रतिनिधींकडे गेलेल्या शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांचीच खैरात मिळत असल्याची भावना आहे. संबंधितांवर कारवाई करू, असे सांगितले जाते; मात्र प्रत्यक्षात काळाबाजार सुरूच राहतो. याच संधीचा फायदा घेत बोगस बियाणे विकणाऱ्या टोळ्याही सक्रिय होतात आणि शेतकऱ्यांची फसवणूक करतात. परिणामी, दुबार पेरणीचे संकट ओढवून आर्थिक नुकसान अधिक वाढते.
बळीराजाचा हा संघर्ष थांबवायचा असेल, तर केवळ बैठका आणि घोषणा पुरेशा ठरणार नाहीत. प्रशासनाने थेट मैदानात उतरून खत, बियाणे आणि कृषी निविष्ठांच्या पुरवठ्यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे प्रशासकीय उदासीनता अशा दुहेरी कात्रीत आजचा शेतकरी अडकला आहे.
सर्व संकटांचा सामना करत, कर्जबाजारीपणाची चिंता मनात ठेवूनही बळीराजा पुन्हा एकदा काळ्या आईची ओटी भरण्यासाठी सज्ज झाला आहे. गरज आहे ती योग्य वेळी खते, बियाणे आणि आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याची. त्यातूनच देशाच्या अन्नदात्याला यंदाच्या खरीप हंगामात दिलासा मिळू शकतो.
"हातात पैसा नाही आणि खर्च मात्र वाढतोय"
"हातात पैसा नाही आणि बाजारात बियाणे, खते, मजुरी तसेच ट्रॅक्टरचे भाडे प्रचंड वाढले आहे. अशा परिस्थितीत खरीप हंगामासाठी लागणारे भांडवल कुठून उभे करायचे, हाच आज बळीराजासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे."
— सुधाकर सोनटक्के, स्थानिक शेतकरी


