विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे गावाकडची बातमी
जिल्ह्यातील पिक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली असून, संबंधित प्रशासनावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेचे नेते हेमंत पाटील यांच्या निर्देशानुसार शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांना संबंधित कार्यालयांमध्ये पाठपुरावा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन करत जिल्हा सहसंपर्कप्रमुख रवि उत्तमराव राठोड व माहूर तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
सन 2025–2026 च्या खरीप हंगामातील सोयाबीन पिक विमा नुकसान भरपाई संदर्भात, जिल्ह्यातील 21 मंडळांसह माहूर तालुक्यातील 4 मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोग (Crop Cutting Experiments) प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले असून, प्रत्यक्ष परिस्थिती न दर्शवता चुकीचे अहवाल सादर करण्यात आले. काही ठिकाणी प्रत्यक्ष प्रयोग न करता कागदोपत्री नोंदी पूर्ण केल्याची शंका देखील व्यक्त करण्यात आली आहे.
या त्रुटींमुळे अनेक पात्र शेतकरी पिक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहिले असून, ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिवसेनेने आपल्या निवेदनात पुढील मागण्या केल्या आहेत.
प्रकरणाची उच्चस्तरीय स्वतंत्र चौकशी करावी.
दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे.
संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
वंचित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.
भविष्यात अशा त्रुटी टाळण्यासाठी पारदर्शक यंत्रणा लागू करावी.
सदर प्रकरणामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली असून, जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे रवि राठोड यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

