Akola police| महिलांच्या सुरक्षेसाठी मूर्तिजापूर शहर पोलिसांचा अभिनव उपक्रम

 


क्यूआर कोड स्कॅन करताच तात्काळ मदत; तक्रारदारांची ओळख राहणार गोपनीय


संपादक- मिलिंद जामनिक 

मूर्तिजापूर : महिलांच्या सुरक्षेबाबत वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर शहर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अभिनव पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या संकल्पनेतून ‘महिलांची सुरक्षा’ अभियानांतर्गत विशेष सुरक्षा क्यूआर कोड विकसित करण्यात आला असून, दि. १ मे २०२६ पासून हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक  चंद्रकांत रेड्डी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात येत आहे.



या क्यूआर कोडची सुविधा मुली व महिलांचा वावर अधिक असलेल्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालये, अभ्यासिका, बसस्थानके, ट्युशन क्लासेस आदी ठिकाणांचा समावेश आहे. संबंधित महिलांना कोणत्याही प्रकारची तक्रार, छेडछाड, त्रास किंवा सुरक्षेसंदर्भातील माहिती द्यायची असल्यास क्यूआर कोड स्कॅन करून ऑनलाइन स्वरूपात माहिती भरता येणार आहे.तक्रार प्राप्त होताच पोलिसांकडून तात्काळ मदत व आवश्यक कारवाई करण्यात येणार असून, तक्रारदार मुली किंवा महिलांचे नाव व ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.



महिलांना निर्भय वातावरण मिळावे, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलिसांशी थेट संपर्क साधता यावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.मूर्तिजापूर शहर पोलिसांच्या या पुढाकाराचे नागरिकांकडून स्वागत होत असून, महिलांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम प्रभावी ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post