बबन वानखेडे यांच्या इशाऱ्याने प्रशासन जागे; गोकुंदा रस्त्याच्या कामांना सुरुवात, चक्काजाम आंदोलन स्थगित

 


विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे,मो- 70388 22361

किनवट : राष्ट्रीय महामार्ग क्र. 161-A वरील रखडलेली कामे, निकृष्ट दर्जा आणि वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते बबन वानखेडे यांनी दिलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रशासन अखेर खडबडून जागे झाले आहे. 20 मे रोजी नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग), नांदेड यांनी तातडीने हालचाली करत गोकुंदा येथील रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

कमठाला व इतर ठिकाणी रस्त्यावर पडलेल्या भेगा व खड्ड्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू करण्यात आली असून, अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिट रस्ता फोडून नव्याने (रिप्लेसमेंट) काम केले जाणार आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या कामांना अखेर गती मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, प्रमुख मागण्या मान्य झाल्याने बबन वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील नागरिकांनी 20 मे रोजीचे चक्काजाम आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला असून, प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे.

मात्र, कामांचा दर्जा समाधानकारक नसेल किंवा रस्त्यावरील समस्या पुन्हा निर्माण झाल्यास अधिक तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वानखेडे यांनी दिला आहे. “नागरिकांच्या जीवाशी खेळ करणारी निष्काळजीपणा सहन केला जाणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

राष्ट्रीय महामार्गावरील दुरवस्था, वारंवार होणारे अपघात आणि प्रशासनाची सुरुवातीची उदासीनता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. मात्र आंदोलनाच्या ठोस भूमिकेमुळे प्रशासनाला हालचाल करावी लागली असून, आता कामे प्रत्यक्षात सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post