प्रभाग क्रमांक १ मध्ये पाणीपुरवठा एक दिवसाआड; नागरिक संतप्त
तळेगाव दशासर (प्रतिनिधी) – उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. एक दिवसाआड केवळ दोन तासच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तळेगाव दशासर येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळयोजना राबविण्यात आली होती. या योजनेमुळे गावकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या की आता नियमित व मुबलक पाणीपुरवठा होईल. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसून येत आहे.
गावातील अनेक प्रभागांमध्ये अद्यापही नियमित पाणीपुरवठा होत नसून, काही ठिकाणी नागरिकांना अजूनही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिकांनी तातडीने सुरळीत व नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामपंचायतीकडे केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा देखील देण्यात येत आहे.
