Gavakadachi batmi
हिंगणी ग्रामपंचायत सरपंचावर थेट अपात्रतेची कारवाई
Amaravati, Maharashtra
अमरावती, amaravatinews: अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हिंगणी (बु.) ग्रामपंचायतीतील गंभीर अनियमिततेच्या प्रकरणात प्रशासनाने मोठा निर्णय घेत सरपंचावर थेट अपात्रतेची कारवाई केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून ग्रामपंचायत व्यवस्थेवर याचे दूरगामी परिणाम होणार असल्याची चर्चा सुरू आहे.
ग्रामपंचायतीतील कारभारात नियमभंग होत असल्याची तक्रार श्याम हरणे (तंटामुक्ती अध्यक्ष, हिंगणी बु.) यांनी केली होती. या तक्रारीनंतर जिल्हा परिषद, अमरावती यांच्या मार्फत सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान ग्रामपंचायतीच्या कामकाजात गंभीर त्रुटी, बैठकींच्या प्रक्रियेत अनियमितता तसेच कर्तव्यात कसूर झाल्याचे निष्पन्न झाले.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ मधील कलम ३९ (१) अन्वये दि. १४ मार्च २०२६ रोजी अपर आयुक्त सुजित वाघमारे (अमरावती) यांनी आदेश पारित करत सरपंच संदीप प्रकाश लहाने यांना पदासाठी अपात्र घोषित केले.
प्रशासनाच्या या निर्णायक कारवाईमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नियमभंग सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे..
भविष्यात ग्रामपंचायतींच्या कामकाजावर अधिक कडक नियंत्रण ठेवले जाणार असल्याचे संकेतही या निर्णयातून मिळत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. हिंगणी ग्रामपंचायतीतील हा निर्णय इतर ग्रामपंचायतींसाठीही इशारा ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.
