राष्ट्रीय महामार्ग 161-A ची दुरवस्था; 20 मे रोजी चक्काजाम आंदोलनाचा इशारा

 


 

प्रत्येक्ष काम सुरू केल्याशिवाय आंदोलन मागे नाही – बबन वानखेडे


विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे 

किनवट  :किनवट तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 161-A वरील रखडलेली कामे, निकृष्ट दर्जा तसेच रस्त्यावर पडलेल्या भेगा व खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त नागरिकांनी 20 मे 2026 रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला असल्याची माहिती बबन वानखेडे यांनी दिली.

यासंदर्भात 18 मार्च 2026 रोजी नागरिकांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग विभाग, नांदेड) यांनी पत्राद्वारे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आश्वासन दिले होते. गोकुंदा परिसरातील रस्त्याच्या दुरुस्ती व देखभाल कामासाठी सुमारे 92 लाख 79 हजार 525 रुपयांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. तसेच रस्त्यावरील भेगा तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले होते.



दरम्यान, 16 मार्च 2026 रोजी ई-प्रोक्युअरमेंट प्रणालीद्वारे संबंधित कामाचा टेंडर प्रसिद्ध करण्यात आला होता. गोकुंदा येथील KM 91/600 ते KM 92/800 या दरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. या आश्वासनांचा आदर राखून आंदोलकांनी पूर्वी प्रस्तावित आंदोलन मागे घेतले होते.

मात्र, आजतागायत प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नसून रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अपघातांची संख्या वाढली आहे. वाहनचालक, नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, गोकुंदा परिसरातील रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नसल्याने प्रशासनाच्या आश्वासनांची अंमलबजावणी झालेली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काही ठोस मागण्या केल्या आहेत. गोकुंदा येथील सेंट मेरी स्कूल ते पेट्रोल पंप दरम्यानचे काम तात्काळ सुरू करावे, कमठाळा व इतर ठिकाणांवरील सर्व खड्डे व भेगा त्वरीत दुरुस्त कराव्यात, अपघात टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना (सूचना फलक, वेग नियंत्रण) कराव्यात, तसेच संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास 20 मे 2026 रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बबन वानखेडे यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post