Gavakadachi batmi| वाळू माफियांची दादागिरी; तक्रार केल्याच्या संशयावरून युवकाला मारहाण; जीवे मारण्याची धमकी

 






माहूर तालुक्यातील हडसणी परिसरात वाळू माफियांची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली आहे. अवैध वाळू उपशाला विरोध केल्याच्या संशयावरून एका युवकाला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित युवक हा मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास तो गुरुकुल विद्यालयाजवळून घरी परतत असताना आरोपींनी त्याला अडवले.

“आमच्या गाड्या नदीत सुरू असताना तू नायब तहसीलदाराला का बोलावले?” असा जाब विचारत आरोपींनी त्याच्याशी शिवीगाळ केली. त्यानंतर धक्का-बुक्की करत त्याला मारहाण करण्यात आली आणि “जीवे मारू” अशी धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी अभिषेक कदम, ओंकार अर्जुन शिंदे, समाधान बंडू जाधव आणि परसराम दत्ता हुंबे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३५१, ३५२, ३५१(१)(२) आणि ३(५) अन्वये  गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, तालुक्यात अवैध वाळू उपशाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.





Post a Comment

Previous Post Next Post