विद्यार्थी हितासाठी निधी उभारणीचा उपक्रम; गावकऱ्यांच्या उपस्थितीत पारदर्शक प्रक्रिया
Editor Milind jamnik
मूर्तिजापूर - तालुक्यातील दताळा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मालकीची शेती यावर्षीही पारदर्शक पद्धतीने लिलाव करण्यात आला. दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता शाळेच्या प्रांगणात झालेल्या या लिलावामध्ये गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. विशेष म्हणजे, यंदाच्या लिलावात रामेश्वर खांडेकर यांनी ५८,००० रुपयांची सर्वोच्च बोली लावत शेती एक वर्षासाठी वाहितीस घेतली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेच्या २ एकर ३ गुंठे (सुमारे ८३ आर) क्षेत्रफळाच्या शेतीचा लिलाव आयोजित करण्यात आला होता. शाळेच्या शिक्षिका रुक्मिणी खांडे यांनी लिलावाच्या नियमावलीचे सविस्तर वाचन करून प्रक्रिया पारदर्शक ठेवली. शाळेचे मुख्याध्यापक निलेश भारसाकळे यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या निर्णयानुसार २०,००० रुपयांपासून बोलीची सुरुवात केली.
या लिलाव प्रक्रियेत रामेश्वर खांडेकर, योगेश सोनवणे,राजेश पुंडकर, श्रीकृष्ण खांडेकर यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. चुरशीच्या बोलीनंतर शेवटी रामेश्वर खांडेकर यांनी सर्वाधिक ५८,००० रुपयांची बोली लावत लिलाव जिंकला. त्यांच्या या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.शाळेच्या प्रगतीसाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत असून, मिळणारा निधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा, पायाभूत सोयी आणि विविध उपक्रमांच्या उन्नतीसाठी वापरण्यात येणार आहे. ग्रामीण भागात शिक्षणासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे आर्थिक बळकटी मिळत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अमित जायले, उपसरपंच निलेश सोनोने, सेवानिवृत्त सैनिक अजय जायले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य राहुल गवळी, तसेच रावसाहेब ठाकरे, चेतन खांडेकर, संजय गावंडे, दिनेश खांडेकर, चेतन गावंडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या संपूर्ण प्रक्रियेत शाळा प्रशासनाने दाखविलेली शिस्तबद्धता आणि पारदर्शकता यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, रामेश्वर खांडेकर यांच्या पुढाकारामुळे शाळेच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
