शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर किसान सभेचा आरपार लढ्याचा निर्धार; माहूर ते नांदेड निघणार भव्य 'पायी लॉंग मार्च'






​माहूर ,कुपटी : तालुक्यातील देवस्थान, वन आणि गायरान जमिनीचे प्रलंबित प्रश्न तसेच सरसकट कर्जमाफी यांसारख्या ज्वलंत मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आगामी काळात माहूर ते नांदेड असा भव्य 'पायी लॉंग मार्च' काढून आरपारचा लढा देण्याचा संकल्प किसान सभेच्या ९ व्या तालुका अधिवेशनात करण्यात आला.

​अखिल भारतीय किसान सभेचे ९ वे माहूर तालुका अधिवेशन आज रविवार, दि. १२ एप्रिल रोजी कुपटी येथे उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनाला किसान सभेचे राज्य पदाधिकारी कॉ. अर्जुन आडे, कॉ. शंकर सिडाम आणि कॉ. किशोर पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

​'केवळ आश्वासने नको, जमिनीचा हक्क हवा'

उपस्थितांना मार्गदर्शन करताना कॉ. अर्जुन आडे म्हणाले की, "शेतकरी आजही आपल्या हक्काच्या जमिनीसाठी संघर्ष करत आहे. सरकार कर्जमाफीच्या केवळ घोषणा करते, परंतु जाचक अटी व नियम लावून हजारो शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्याचे षडयंत्र रचले जात आहे. आता केवळ निवेदने देऊन प्रश्न सुटणार नाहीत, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ आली आहे."

​ तालुक्यातील देवस्थान, गायरान व वन जमिनीचे मालकी हक्क कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावेत, कोणत्याही अटीशिवाय सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे.​लॉंग मार्चची हाक: या मागण्यांच्या पूर्ततेसाठी माहूर ते नांदेड असा हजारो शेतकऱ्यांचा ऐतिहासिक 'पायी लॉंग मार्च' काढण्याचा निर्णय व ठराव एकमताने घेण्यात आला.

​या अधिवेशनात तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

अधिवेशनात आगामी काळासाठी नवीन तालुका समिती गठीत करण्यात आली, त्यात अध्यक्ष पदी शंकर गंधमवार, सचिव पदी  संजय मानकर,डॉ बाबा डाख़ोरे उपाध्यक्ष,राजु पिसरवाड उपाध्यक्ष,अनिल राठोड सहसचिव,कैलास भरणे सहसचिव,तुळसिंग चव्हाण,बलदेव राठोड, दत्तप्रसाद कांबळे, गणपत राठोड ,प्रफुल्ल असोले यांची सदस्य पदी निवड करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post